Sanjay Raut Ed Inquiry : संजय राऊत यांची 8 तासांपासून ईडी चौकशी सुरुच
Sanjay Raut Ed Inquiry : संजय राऊत यांची दुपारी बारा वाजल्यापासून ईडी चौकशी सुरु आहे.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची तब्बल 8 तासांपासून ईडी चौकशी (Sanjay Raut Ed Inquiry) सुरु आहे. राऊत यांची पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) ही ईडी चौकशी केली जात आहे. आपण पळपुटे नाही, ईडीवर विश्वास आहे. ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं राऊत यांनी चौकशीला सामोर जाण्याआधी म्हटलं होतं. तर पत्राचाळ कुठेय हे माहिती नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. (shiv sena mp sanjay raut ed inquiry is on more than last 8 hours in Patra chawl land scam case)
राऊत यांची दुपारी बारा वाजल्यापासून ईडी चौकशी सुरु आहे. चौकशीला 8 तास उलटले, त्यानंतरही चौकशी सुरूच आहे. त्यामुळे आता ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी आणि राऊत समर्थकांनी जमायला सुरवात केली आहे.
काय आहे पत्राचाळ प्रकरण? (what is Patra chawl land scam case)
मुंबईतील गोरेगावमध्ये ही पत्राचाळ आहे. या पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊत यांच्या मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली.
राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचं पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं. मात्र गुरु आशिष कन्सट्रक्शन कंपनीने भाडेकरुंसाठी आणि म्हाडासाठी सदनिका न बांधताच एकूण 9 विकसकांना तब्बल 901 कोटींना एफएसआय विकला.
गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रकल्प सुरु करण्यात आला. तसेच सदनिका विकण्याच्या नावाखाली 138 कोटींची माया जमा करण्यात आली.
मात्र यानंतर म्हाडाच्या अभियंत्याने याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर ईडीची एन्ट्री झाली. ईडीने या प्रकरणात चौकशी सुरु झाली. ईडीला तब्बल 1039.79 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यापैकी प्रवीण राऊत यांच्या खात्यात 100 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
प्रवीण यांनी ही रक्कम आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे ट्रान्सफर केली. या 100 कोटींपैकी 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी दिल्याचं समोर आलं.