शिवसेना खासदार संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटलांना चिमटा
`खरं बोलल्याबद्दल अभिनंदन` असं चंद्रकांत पाटलांना संजय राऊत का म्हणाले पाहा....
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला आहे. चंद्रकात पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी चिमटा काढला. त्यांनी भाजपवरही टीकास्त्र सोडलं आहे.
चोऱ्यामाऱ्या करून आलेलं सरकार टिकणार नाही. आधी सरकार स्थापन करा मग बोला. मी चंद्रकांत पाटील यांचं अभिनंदन करतो. कारण भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. भाजपमध्ये मनमोकळं बोलता येत नाही. चंद्रकांत पाटील खरं बोलल्याने त्यांचं अभिनंदन असं म्हणत राऊत यांनी चिमटा काढला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. पनवेलमध्ये राज्य कार्यकारिणीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्याच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयाचं आपल्याला दुःख झालं. पण ते दुःख पचवून आपण सर्व पुढे गेलो असं पाटील म्हणाले.
महत्त्वाचं म्हणजे चंद्रकांत पाटील यांचं हे भाषण माध्यमांमध्ये आल्यानंतर सगळ्या सोशल मीडियावरुन काढून टाकण्यात आलं. तर आपल्या सगळ्यांचे नेते हे एकनाथ शिंदेच आहेत, असं सांगत फडणवीसांनी सावरासावर केली.