Maharashtra Political crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे त्यावर लोकांचा विश्वास आहे. ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांनी शिवसेना (Shivsena) नावाचा वापर करु नये, आपल्या बापाचं नाव वापरुन मत मागावं असं आव्हान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरायचा, बाळासाहेबांचे भक्त असल्याचं सांगायचं आणि पाठीत खंजीर खुपसायचा अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.  बंडखोर आमदारांना मुंबईत यावंच लागेल, हजारो, लाखो शिवसैनिकांना आमच्या एका इशाऱ्याची प्रतीक्षा आहे.  पण आम्ही अजूनही संयम राखला आहे, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. 


बंडखोर नेते जेव्हा मुंबईत येतील तेव्हा कळेल नक्की बंडखोरी कुठे होणार आहे. अस्वस्तता हा शब्द खुप सौम्य आहे, बंडखोरांमध्येसुद्धा बंडखोरी होऊ शकते, अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.


राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना संपवण्याचा आरोप बंडखोर आमदारांकडून केला जात आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. अडीच वर्ष सत्तेत मलाईदार पोर्ट फोलिओ घेऊन बसले आहेत, आता अचानक त्यांना साक्षात्कार झाला आहे का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 


आपल्या बापाच्या नावाने पार्टी बनवा आणि बापाच्या नावाने मतं मागा, तुम्हाला शंभर बाप आहेत, कोण दिल्लीत आहे, कोण नागपूरमध्ये आहे, कोण मुंबईत आहे. शंभर वेळा बाप बदलले, कधी सुरतला जाता, कधी गुवाहाटीला जाता, कधी बडोद्याला जाता. बाप बदलण्याची पद्धत आमच्या पक्षाची नाही. आमचा बाप एकच आहे बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांच्याप्रती आमची निष्ठा आहे, असं सांगत संजय राऊत यानी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
 
तुमच्यात धमक असेल तर राजीनामा द्या आणि निवडणूक लढवून दाखवा, असं ओपन चॅलेंज संजय राऊत यांनी दिलं आहे. 


एका आमदाराने म्हटलंय, काय झाडी आहे, काय डोंगार आहे, काय हाटेल आहे, मग महाराष्ट्रात काय स्मशान आहे का असा टोला संजय राऊत यांनी बंडखोर आमदार शाहाजीबापू पाटीलयांना लगावला आहे.