मुंबई : मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा सुरु आहे. या बैठकीत राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि अजित पवार उपस्थित आहेत, तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हे उपस्थित आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन-तीन दिवसात खातेवाटप जाहीर करू असं पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं होतं. पण खातेवाटपाला मुहूर्त अजून ही मिळालेला नाही. पण आजच्या बैठकीनंतर लवकरच खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याआधी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी खातेवाटपसंदर्भात चर्चा झाल्याचं सूत्रांनी म्हटलं होतं.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ६ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीनही पक्षाचे प्रत्येकी २ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. पण त्यानंतर कोणाला कोणतं खातं मिळेल याची उत्सुकता महाराष्ट्राच्या जनतेमध्ये होती. पण अजूनही महाविकासआघाडीला खातेवाटपाचा मुहूर्त मिळत नसल्याने ही उत्सूकता आणखी ताणली गेली आहे.