सहाव्या जागेचा `चाप्टर क्लोज` शिवसेनेच्या `या` मावळ्याला राज्यसभेची उमेदवारी
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सांगितलं उमेदवाराचं नाव
Rajya Sabha election : राज्यसभा निवडणुकीत आता चुरस निर्माण झाली आहे. राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवारी देण्याचं शिवसेनेने निश्चित केलं आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांना माहिती दिली.
संजय पवार हे शिवसेनेचे मावळे आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत घोषणा लवकरच होईल अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत, दोन्ही जागेवर शिवसेनेचे उमेदवार लढतील आणि दोन्ही जागेवर शिवसेनेचे उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरचे संजय पवार हे शिवसेनेचे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत, कडवट शिवसैनिक आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेचा विषय शिवसेनेसाठी बंद झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
'संभाजीराजेंविषयी आम्हाला आदर'
संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी आम्हाला आदर आहे, त्यासाठीच सहाव्या जागेसाठी तुम्ही उमेदवार व्हा अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला, त्यांना राज्यसभेवर जायचं आहे, त्यांना अपक्ष लढायचं आहे, पण अपक्ष लढण्यासाठी 42 मतांची गरज आहे, तितकी मतं असतील तर ते राज्यसभेवर निवडून येतील अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.