मुंबई : सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्याबाबत अभिनंदन. पण, कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून मते मागण्याचा उद्योग राजकीय शहाण्यांनी करू नये. तसेच, कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी कोटय़वधीची जाहिरातबाजी करण्यापेक्षा हा पैसाही शेतकऱ्यांच्याच कल्याणासाठी वापरा. किमान हजार कुटुंबांना त्यातून जगवता येईल, असा असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी मित्रपक्ष भाजपला लगावला आहे.
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी दै. सामनात लिहिलेल्या लेखात सरकारचे अभिनंदन केले आहे. पण, हे अभिनंदन करत असतानात सरकारला टपल्याही हाणल्या आहेत. कर्जमाफीचा पैसा आम्हीच दिला व कर्जमाफी केली म्हणून मते द्या असले उद्योग राजकीय शहाण्यांनी करू नयेत. तसे करणार असाल तर तीन वर्षांत चार हजारांवर शेतकरी मरण पावले, त्यांच्या आत्महत्येची जबाबदारीही या मंडळींनी घ्यावी, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात गेल्या पंधरा वर्षांत १७ हजारांवर शेतकऱ्यांनी कर्ज व नापिकीस कंटाळून आत्महत्या केल्या. त्यातील साडेतीन हजार आत्महत्या फडणवीस सरकारच्या काळात झाल्या, ही दुःखाची बाब आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली तर महाराष्ट्रात आर्थिक अराजक निर्माण होईल व असे आर्थिक अराजक घडवून सरकार अस्थिर करण्याचा राजकीय डाव असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी करावा हे दुर्दैवच म्हणावे लागेल, असेही ठाकरे यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.


कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटप केल्याच्या मुद्द्यावरूनही ठाकरे यांन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ४ हजार कोटी रुपये जमा झाल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली. घरातील दिवाळी फराळ वाटावा अशा थाटात हे ‘वाटप’ झाले. कर्जमाफीसाठी अर्ज भरलेले शेतकरी हे लाचार किंवा भिकारी नाहीत व त्यांना भीक नको आहे, हे राज्यकर्त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. हे पैसे कोणी आपल्या खिशातून दिलेले नाहीत किंवा पक्षाच्या गलेलठ्ठ तिजोरीतूनही काढून दिलेले नाहीत. हे राज्य शेतकरी-कष्टकरी श्रमिकांच्या रक्त व घामातून निर्माण झाले व टिकले. त्या कष्टकऱ्यांना अडचणीच्या काळात केलेली ही दिलदार मदत आहे, असेही ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसहीत सरकारला सुनावले आहेत.