मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील नियोजित स्मारक हे एकट्या भाजपचे नाही, तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे आहे, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला. शिवस्मारकाचे श्रेय एकट्यानेच लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला 'सामना'तील अग्रलेखातून खडे बोल सुनावण्यात आले आहेत. 
 
 शिवस्मारक हे पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. श्रद्धा कमी व राजकारण जास्त असे दुर्दैवाने स्मारकाच्या बाबतीत घडत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांना मुंबईत बोलावून घाईघाईने स्मारक उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून घेतला. हे स्मारक सरकार बांधत नसून भारतीय जनता पक्षाच्या कोषातून बांधणी सुरू आहे, असे वातावरण निर्माण करण्यात आल्याची टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. 
 
 शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला निघालेल्या बोटीला अपघात होऊन शिवसंग्राम संघटनेच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. या कार्यक्रमाला इतर पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित न केल्यामुळे भाजपवर टीकेची झोड उठली होती. 
 
 या पार्श्वभूमीवर शिवस्मारकाच्याबाबतीत भाजप राजकारण करत असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे. 
 
 निदान छत्रपती स्मारकाबाबत तरी संयम बाळगणे गरजेचे होते. स्मारक महाराष्ट्राचे सरकार करीत आहे. भाजप किंवा मेटे यांची शिवसंग्राम नाही. २०१९ मध्ये आहे ते सरकार उलथले तर पुन्हा नवे श्रेयकरी पुढे येतील. छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात होणे ही अभिमानाचीच बाब आहे. शिवस्मारक व्हावे, पण बुडालेल्या बोटीबरोबर स्मारकाचे राजकारणही कायमचे बुडावे, अशी आशा या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.