मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. यावेळी मोदींनी हिंदू मतदारांना साद घालण्यासाठी भगवा फेटा परिधान केला होता, असा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील अग्रलेखात मोदींच्या सोयीस्कर हिंदुत्त्ववादी भूमिकेवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांनी या वेळी लाल किल्ल्यावरून भाषण करताना डोक्यावर भगवा फेटा घातला हे कौतुकास्पद आहे. 2019 च्या निवडणुकांत पुन्हा एकदा ‘हिंदू’ म्हणून मतदारांना साद घालण्याचा हा प्रकार आहे. पुण्यात सुरू झालेले ‘पगडी’चे राजकारण आता लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले. पण डोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील काय? अयोध्येत राममंदिराचे काय होणार? ते कधी उभे राहणार? यावर पंतप्रधानांनी भाष्य केले असते तर लाल किल्लाही रोमांचित झाला असता व लाल किल्ल्यानेच स्वतःच्या डोक्यावर भगवा फेटा बांधून घेतला असता, असे या अग्रलेखात म्हटले आहे. 


तसेच यावेळी देशवासीयांना पंतप्रधानांच्या भाषणाविषयी बिलकूल उत्सुकता नव्हती, अशी टीकाही सेनेने केली. मोदी काय बोलणार हे देशाला माहीतच होते. पंतप्रधानांनी देशवासीयांची निराशा केली नाही. पंतप्रधान म्हणून 'मोदी' यांनी पाच भाषणे केली. साधारण विषय तेच आहेत. प्रत्येक भाषणात गरीबांचा कळवळा हा असतोच व तोच याही वेळी प्रमुख विषय होता.  पंतप्रधान मोदी यांची भाषणे म्हणजे आकडे, घोषणा व योजनांची आतषबाजी असते व त्यासाठी लाल किल्ल्याचे प्रयोजन केले जाते, अशी टीका सेनेकडून करण्यात आली.