गरज सरो आणि वैद्य मरो; शिवसेनेचा भाजपला टोला
पण इथे वैद्य मरणार नाही. त्याच्या जिभेखाली संजीवनी गुटिका आहे.
मुंबई: राज्यातील सत्तावाटपावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरु असलेला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. भाजपचे सध्याचे वर्तन म्हणजे गरज सरो आणि वैदय मरो असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. २०१४ साली देशात मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भव्य यश मिळताच भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडली. २०१९ साली तसेच यश मिळाल्याप्रमाणे 'गरज सरो वैद्य मरो'चा दुसरा अंक सुरु झाल्याचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त म्हटले आहे. मात्र, कितीही पेच किंवा चक्रव्युह निर्माण झाले तरी शिवसेनेला अशा संकटांची पर्वा नाही, असाही इशाराही या अग्रलेखातून देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सहा दिवस उलटले तरी शिवसेना आणि भाजपचे घोडे सत्तावाटपावरून अडले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेला महत्त्व प्राप्त झाले होते. यानंतर शिवसेनेने सत्तेत फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युलाची अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरला होता.
शिवसेनेने प्लान बदलला? पक्षातच वाढला नरमाईचा सूर
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपने शिवसेनेला असे कोणतेही वचन दिले नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे शिवसेना डिवचली गेली होती. शिवसेना आणि भाजप यांच्यात काही ठरलेच नसेल तर चर्चा करण्यात काय अर्थ आहे, असा सवाल विचारत शिवसेनेकडून भाजपसोबतची बुधवारची नियोजित बैठकही रद्द करण्यात आली होती.
दरम्यान, भाजपकडून विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा निवड करण्यात आली. तर गुरुवारी मुंबईत शिवसेनेच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी शिवसेना भवनात बैठक होत आहे. यावेळी उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेने जास्त ताणू नये, भाजपकडे दुसरा पर्याय आहे - रामदास आठवले