मुंबई : अंधेरीच्या पोटनिवडणुकीत (Andheri By Election 2022) माघार घेऊनही शिवसेना ठाकरे गटानं (Shiv Sena) पुन्हा एकदा भाजपला (Bjp) डिवचलंय. त्यावरून भाजप विरुद्ध ठाकरे गट (Bjp vs Thackeray) असा वादाचा पुढचा सामना सुरू झालाय. आश्चर्य म्हणजे अजित पवारांनीही (Ajit Pawar) या वादात उडी घेतली आणि चक्क ठाकरे गटाला दोन शब्द सुनावले. (shiv sena thackeray group critisize to bjp after bjp murji patel withdraw candidature saamana editorial)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अंधेरीतून कमळाबाईंनी पळ काढला...' शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ची ही हेडलाईन. अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतलीय. त्यामुळं अंधेरीतला घमासान राजकीय सामना टळला. त्याबद्दल आभार मानण्याऐवजी ठाकरे गटाच्या मुखपत्रातून जोरदार आगपाखड करण्यात आली. 


ठाकरे गट विरुद्ध भाजप 'सामना'


बेटकुळ्या फुगवून शड्डू ठोकणा-यांना मशालीचे चटके बसले व त्यांनी कुस्ती न खेळताच मैदान सोडलं. अब्रू वाचावी म्हणून 'झाकली मूठ' बंदच ठेवली... शिवसेनेच्या ज्वालाग्राही मशालीचा हा पहिला विजय आहे. बूड भाजण्यापेक्षा तोंड भाजलेलं बरे म्हणून भाजपनं दारुण पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी माघारीचा सोपा मार्ग निवडला. पण सेफ पॅसेज शोधूनही जी बेअब्रू व्हायची ती झालीच !


सामनाच्या या अग्रलेखावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही जोरदार पलटवार केला. ग्रामपंचायत ते पार्लमेंट भाजपच नंबर एक आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. नाही तर पेग्विन सेना, घरात बसून 'गणपत वाण्या'सारखी नुसती स्वप्नं बघणार. 'सामना'च्या अग्रलेखात अजरामर गणपत वाणी आज महाराष्ट्राला पुन्हा दिसला. गल्लीत कोणी नाही याची खात्री करुन पोकळ आवाज देणारे डरपोक पण दिसले! अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ, असं ट्विट शेलारांनी केलं.


दरम्यान, भाजप आणि ठाकरे गटात हा सामना रंगला असताना अजित पवारांनी उडी घेतली. चांगलं झालंय तर उगाच कशाला डिवचता? असे खडे बोल अजित पवारांनी ठाकरे गटाला सुनावले. एकीकडं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दाखले देत भाजपनं उमेदवार मागे घेतला. तर दुसरीकडं एकमेकांबद्दलची राजकीय कटूता कशी वाढलीय आणि राजकारणात सूडाची संस्कृती कशी पेट घेतेय, याचंच उदाहरण यानिमित्तानं पाहायला मिळतंय.