अंमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : राज्यात काही महिन्यांपूर्वी राजकीय (Maharashtra Politics) भूकंप झाला. मविआचं सरकार गेलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भाजपसोबत शिंदे गट गेल्याने सर्व राजकीय समीकरणच बदलली. आधी ठाकरे गटावर टीका करण्यासाठी भाजपला शिंदे गटाच्या रुपात आणखी एक मित्र भेटला. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे सातत्याने मविआच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर एसआरए घोटाळ्यावरुन तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावरुन दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच हमरीतुमरी पाहायला मिळाली. मात्र आज या दोन्ही राजकीय वैरी असलेल्या नेत्यांची अनोखी भेट पहायला मिळाली. (shiv sena thackeray group former mayor kishori pednekar and bjp leader kirit somaiya meets at mumbai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमय्या आणि पेडणेकर या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांची भेट झाली. या भेटीची सोशल मीडियावर सध्या जोरदार र्चचा रंगलीय. इतर वेळ एकमेकांचे हार्डकोर राजकीय वैरी असलेले हे दोन्ही नेते एकाच ठिकाणी भेटले. निमित्त होतं ते एका विवाह सोहळ्याचं. 


किरीट सोमय्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर अचानकपणे समोरासमोर आले. निमित्त होतं एका लग्नसोहळ्याचं. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. इतकच नाही तर किरीट सोमयांचे सुपुत्र नील सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांचे आशीर्वादही घेतले. 



सोशल मीडियावर चर्चा 


दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या भेटीची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगलीय. एका बाजूला या भेटीतून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन घडल्याचं म्हटलं जातंय. तर दुसऱ्या बाजूला माझा पक्ष तुझा पक्ष म्हणत कायम एकमेकांची डोकी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही भेट ठरलीय.