मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) खासदारांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत एनडीएच्या (NDA) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू  (Draupadi Murmu)  यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  पुढील दोन दिवसांत निर्णय़ घेणार असल्याची माहिती खासदार गजानन किर्तीकर यांनी दिलीय. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या निर्णय़ाकडे लक्ष लागलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र यशवंत सिन्हांना पाठिंबा देण्याची ठाम भूमिका मांडली. त्यामुळे संजय राऊत विरूद्ध इतर खासदार असा सामना रंगला.  याबाबत बोलताना संजय राऊत यांनी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे असल्याचं स्पष्ट केलं.


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत दोन्ही उमेदवारांबाबत चर्चा झाली. द्रोपर्दी मुर्मु आणि यशवंत सिन्हा या दोघांबाबत चर्चा झाली. शिवसेनेने राजकारणापलिकडे जाऊन व्यक्ती म्हणून राष्ट्रपती उमेदवाराला आपलं पाठबळ दिलं आहे. यासंदर्भात चर्चेनंतर सर्व खासदारांनी निर्णय घेण्याचा अधिकार हा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा सर्वांसाठी बंधनकारक असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.


मातोश्रीवर झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे केवळ 12 खासदार हजर होते, तर 7 खासदार नॉट रिचेबल होते. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी माहिती दिली.संजय जाधव आजारी आहेत, हेमंत पाटील ते पोहचू शकले नाहीत. गुजरातमध्ये मुसळधार पाऊस असल्याने कलाबेन डेलकर येऊ शकल्या नाहीत. श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी यांच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. अनिल देसाई कोर्टाच्या कामासाठी दिल्लीत आहेत असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.


शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आहे, बाकी कोणाची नाही, पदावर ठेवण्याचे आणि काढण्याचे अधिकार पक्षप्रमुखांचे आहेत आणि त्यानुसार निर्णय घेण्यात आलेला आहे असंही संजय राऊत यांनी सांगितलं.