`अजहर मसूदला पाणी पाजल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही`
या ऑपरेशनद्वारे भारतीय वायुसेनेनं पहिल्यांदाच एलओसी पार करत एखादं ऑपरेशन पूर्ण केलंय
नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेनं मंगलवारी पहाटेच पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये (POK) हवाई हल्ले करत दहशतवादी संघटना जैश - ए - मोहम्मदची प्रमुख दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. 'मिराज २०००' तसंच १००० किलो स्फोटकांच्या सहाय्यानं भारतीय वायुसेनेच्या जवानांनी २००-३०० दहशतवाद्यांना ठार केलं. यामध्ये जैश, हिजबुल आणि लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. या ऑपरेशनद्वारे भारतीय वायुसेनेनं पहिल्यांदाच एलओसी पार करत एखादं ऑपरेशन पूर्ण केलंय. उल्लेखनीय म्हणजे, भारतीय वायुदलानं कारगिल युद्धादरम्यानही एलओसी पार केली नव्हती.
भारतीय वायुसेनेच्या या कारवाईचं अनेकांनी कौतुक केलंय. महाराष्ट्रात भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेनंही या एअर स्ट्राईकचं स्वागत केलंय. परंतु, जेव्हापर्यंत जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अजहर मसूद याला ठार केलं जात नाही तेव्हापर्यंत बदला पूर्ण होणार नाही, असंही शिवसेनेनं म्हटलंय.
मोदींच्या निर्णयक्षमतेचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बातमीवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व आणि निर्णयक्षमतेचं कौतुक केलंय. सोबतच, भारतीय वायुदलाच्या जवानांच्या शौर्याचं कौतुक करत अनेक भारतीयाच्या मनात हे होतं ते भारतीय जवानांनी करून दाखवलं... भारत हा मजबूत देश आहे कोणत्याही प्रकारचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही हा संदेश यातून गेला असल्याचं म्हटलंय.
वायदुलाच्या जवानांवर कौतुकाचा वर्षाव
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या बातमीनंतर भारतीय वायुदलाच्या जवानांचं सोशल मीडियावरून कौतुक केलं. तर पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीयांच्या सहनशीलतेचा अंत झाला होता. देशाचा प्रश्न असला तर आपण सर्व जण एक असतो हे आपण दाखवून दिलं. अशा कारवाया आपल्यावर केल्या तर भारत कसं सडेतोड उत्तर देऊ शकतो हे सगळ्या जगाने आज पाहिलंय. ज्यावेळेस अशी परिस्थिती येईल त्यावेळेस सव्वाशे कोटी भारतीय एक आहोत हे दाखवून देऊ. जेणेकरून आपल्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत करणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली.
'जैश'चे दहशतवादी ठार
या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद संघटनेचा प्रशिक्षण तळ आणि शस्त्रास्त्रांचा अगणित साठा पूर्णपणे बेचिराख झाला आहे. याशिवाय, एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे प्रमुख नेते मारले गेले आहेत. यामध्ये अफगाणिस्तान व काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मौलाना अम्मर, मौलाना मसूद अजहरचा भाऊ मौलाना तल्हा सैफ, काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मुफ्ती अझर खान आणि आयसी-८१४ विमानाच्या अपहरणात सहभागी असलेला मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर यांचा समावेश असल्याचे समजतंय.
मसूद अजहर आणि 'जैश'चा काळा इतिहास
पाकिस्तानच्या पंजाब प्रातांत जन्मला आलेला मौलाना मसूद अझहरला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी १९९४ मध्ये पहिल्यांदा गजाआड केलं. मसूदला सोडवण्यासाठी त्याच्या साथीदारांनी २४ डिसेंबर १९९९ ला इंडियन एअरलाईन्सचं विमान आयसी ८१४ चं अपहरण केलं. अपहरण करून हे विमान अफगाणिस्तानात कंधारमध्ये नेण्यात आलं. प्रवाशांना वाचवण्यासाठी भारतानं तीन दहशतवाद्यांना सोडलं. त्यात मसूद अजहरचा समावेश होता. जैश ए मोहम्मद ही भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यूएई, इंग्लंड, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी 'दहशतवादी संघटना' म्हणून घोषित केली. पण पाकिस्तानात संघटना विनासायास फोफावतेय. मसूद अजहरला वाचवण्यासाठी पाकिस्तानला चीनचीही मदत मिळतेय.