शिवसेनेने प्रस्ताव द्यावा, भाजपाचे दरवाजे सदैव उघडे - चंद्रकांत पाटील
महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाकडून
मुंबई : महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाकडून हालचाल सुरू झाली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. ही बैठक संपल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी सरकार स्थापन करण्याविषयी मोठा आशावाद व्यक्त केला आहे. तसेच येणारं सरकार हे महायुतीचंच असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होणार असं चंद्रकांत पाटील यांनी वर्षावरील बैठक संपल्यानंतर पत्रकारांना निक्षून सांगितलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील बैठक संपल्यानंतर चंद्रकांत पाटील, ठळक शब्दात मिठाई मोजतात त्याप्रमाणे मोजक्या, गोड शब्दात सांगत होते, 'शिवसेना आमच्याकडे सरकार स्थापन करण्य़ाविषयी प्रस्ताव घेऊन येईल. यासाठी भाजपाचे दरवाजे शिवसेनेसाठी सदैव उघडे आहेत', भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन देखील उपस्थित होते.
मात्र यात सरकार स्थापनेसाठी भाजपाची दारं शिवसेनेला उघडी असली असं बोललं जात असलं, तरी दोन पक्षातील प्रेम कमी झाल्यासारखंच दिसतंय, म्हणून आता ही लव्ह मॅरेजची भाषा अरेन्ज मॅरेज सारखी झाली आहे.
थोडक्यात भाजप आणि शिवसेनेत स्वत:हून काहीही बोलणी होत नाहीय. कुणीतरी मस्थस्थी केल्यानंतरचं सत्तास्थापनेचं प्रकरण पुढे जाणार आहे.