मुंबई: राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून शिवसेनेच्या 'वाघांची' शिकार केली जाण्याची शक्यता लक्षात घेता उद्धव ठाकरे यांच्याकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज शिवसेनेच्या सर्व आमदारांना तातडीने मातोश्रीवर बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे. ही बैठक संपल्यानंतर सर्व ५६ आमदारांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवण्यात येईल. जेणेकरून भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न झाल्यास त्यांना शिवसेनेच्या आमदारांशी संपर्क साधता येणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आज दुपारी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. भाजपच्या कालच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शिवसेनेला १२ तासांचा अल्टिमेटम देण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर २०१४ प्रमाणेच अल्पमतातील सरकार स्थापण्याची भाजपची योजना आहे. 


भाजपचा शिवसेनेला १२ तासांचा अल्टिमेटम, अन्यथा स्वबळाची तयारी


त्यामुळे आज दिवसभरात अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी अनुकूल असलेला काँग्रेस नेत्यांचा एक गट आज दिल्लीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. यापूर्वी सोनिया यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी प्रतिकूल मत नोंदवले होते. मात्र, आज काँग्रेस नेत्यांनी आग्रह केल्यास सोनिया गांधी राजी होणार का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल. 


'काँग्रेसच्या ९० टक्के आमदारांना भाजपाचं सरकार नको'


तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आम्ही विरोधी बाकांवरच बसणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, पवारांच्या राजकारणाचा एकूण बाज पाहता आगामी तासांमध्ये सत्तास्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाही महत्त्वाची ठरू शकते.