मुंबई : शिवसेना - भाजप यांची युती असली तरी मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच कायम आहे. युतीचे फॉर्म्युला आधी ठरल्याप्रमाणे ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री, असे होते. मात्र, २०१४ ला युती तुटली आणि शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढविली. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापन केली. या सत्तेत शिवसेनाही सहभागी झाली. सत्तेत राहूनही शिवसेनेने आपला विरोध कायम ठेवला. हा विरोध भाजपची डोकेदुखी ठरु लागली. त्यानंतर भाजपने नमते घेत लोकसभेसाठी शिवसेनेपुढे गुडघे टेकलेत. युतीची बोलणी झालीत. आगामी मुख्यमंत्री आणि सत्तेतील वाटाही ठरला. मात्र, भाजपकडून आमचाच मुख्यमंत्री असेल, असे सांगून वादाला फोडणी दिली. आता शिवसेनेचे मुखपत्र सामनातून आज शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यात आली. भाजपशी युती जरुर आहे. पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संगटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे, आपला मुख्यमंत्री करायचाच असा पक्का निर्धार शिवसेनेने केला आहे. भाजपाशी जरी युती असली तरी शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना असून उद्याची विधानसभा भगवी करुन टाकू, त्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चढाओढ दिसून येत आहे. राज्यात आता भाजपची सत्ता असून मुख्यमंत्री भाजपचा आहे. मात्र, शिवसेनेची भूमिका ही कायम आहे. राज्यात आम्ही आणि केंद्रात तुम्ही (भाजप). त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा सूचक इशारा दिला आहे. आज शिवसेनेचा ५४वा वर्धापन दिन असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.



शिवसेनेने भाजपला योग्य तो संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. आणि मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचाच असला पाहिजे. त्यामुळे शिवसैनिकांना कामाला लागावे, असे म्हटले आहे. शिवसेनेने पुन्हा आपला जुना मुद्दा यानिमित्ताने पुढे आणला आहे. राज्यात शिवसेना आणि केंद्रात भाजप. त्यामुळे यावरुन भाजप काय बोध घेणार, याचीही उत्सुकता आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपवर निशाणा साधणारे उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय तडजोड करीत पुन्हा भाजपशी जुळवून घेतले होते. मात्र, त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा युतीचा फॉर्म्युला, लोकसभा उपाध्यक्षपद आणि राम मंदिराचा मुद्दा यावरुन शिवसेनेची पुन्हा एकदा नाराजी दिसून आली आहे. 


गेल्या ५२-५३ वर्षात शिवसेना नावाचे वादळ महाराष्ट्रात सतते घोंघावत आहे. सुरुवातीला जनतेच्या अनेक छोट्यामोठ्या आंदोलनांद्वारे सुरुवात झालेल्या शिवसेनेने नंतरच्या काळात इथल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांचा लढा दिला. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी, पोटापाण्याच्या आणि रोजगाराच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे. आता हीच शिवसेनेची भूमिपुत्रांची भूमिका घेऊन पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तिथल्या भूमिपुत्रांसाठी लढत आहेत. इतकेच नव्हे दक्षिणेतील प्रत्येक राज्य प्रांतीक अस्तितेचे राजकारण करीत आहेत. शिवसेनाप्रमुखांनीच हा प्रांतीय अस्मितेचा विचार मांडला होता त्याला देशाने स्विकारले, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे महत्व विषद केले आहे.