मुंबई : भाजपला आडवे येतील त्यांना ‘पटकून’ टाकू अशी भाषा वापरणाऱ्यांचे राज्य महाराष्ट्रात आहे. मग शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका अशा शब्दांत शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनातून भाजपवर बोचरी टीका केली आहे. शिवस्मारकाच्या कामात सतत अडथळे येत आहेत. याचा अर्थ सरकार याबाबत अजिबात गंभीर नाही, अशीही टीकादेखील करण्यात आली आहे. शिवस्मारक आणि शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याच्या वेळीच प्रश्न उपस्थित होतात. एरवी कोणत्या समस्या उद्भवत नाहीत असा टोलाही सामनातून लगावला आहे. शिवस्मारकाच्या उभारणीत विघ्ने येत आहेत आणि सरकार त्यावर मूग गिळून बसले आहे. 3600 कोटी रुपयांचा हा भव्य प्रकल्प आहे, पण पहिल्या दिवसापासून सरकार या कार्याबाबत गंभीर नसल्याची टीका करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारकही असेच रखडले आहे.  छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकर व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तीन दैवते महाराष्ट्राची आहेत व राहतील, पण शिवराय सगळय़ांचे शिखर आहेत. शिवस्मारक कोर्ट कचेऱ्यात अडकवणे हे लज्जास्पद असल्याची टीकाही सामनातून करण्यात आली आहे.


राजकारण नको 


गुजरातमध्ये नर्मदेच्या तीरावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जागतिक उंचीचा पुतळा उभा राहिला. त्या ठिकाणी कोणतीही पर्यावरणाची समस्या निर्माण झाली नाही किंवा कोणताही तांत्रिक मुद्दा आडव आला नाही.  केंद्राने सवर्णांना 10 टक्के आरक्षण खास घटना दुरुस्ती करून बहाल केले. मुस्लिम महिलांसाठी तिहेरी तलाकचा विषयही घटनेत बदल करून संपवला. हे सर्व प्रश्न सुटले पण अयोध्येत राममंदिर आणि मुंबईच्या अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक होत नाही.


शिवस्मारक आणि शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकावेळी न्यायालय आडवे येते की न्यायालयाची ढाल पुढे करून कोणी ही स्मारके होऊ देत नाही? असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे.  या वीर पुरुषांची स्मारके व्हायला हवी. त्यात राजकारण आणू नये असा टोला लगावण्यात आला आहे.