मुंबई : लॉकडाऊन संपलेला असला तरी असामान्य परिस्थिती असल्यामुळे राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी आणखी तीन महिने पाच रुपयांमध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये गरजूंना जेवण देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतलेला होता. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर सप्टेंबरपर्यंत  लागू राहणार आहे. कष्टकरी,असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे.


शिवभोजनच्या वेळेत वाढ


शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११  ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे.  शहरी भागासाठी प्रति थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रति थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे तसेच भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.



भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण उपलब्ध करून देणे, जेवण तयार करण्याआधी हात कमीत कमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घेणे, भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकामध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना करण्यात आलेल्या आहे.


आणखी दोन महिने सवलतीच्या दरात धान्य


मे आणि जून महिन्यामध्ये एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ प्रति व्यक्ती देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतलेला होता. ही योजना आणखी दोन महिने चालू ठेवली जाणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या तीन कोटी आठ लाख नागरिकांना या योजनेचा फायदा होत आहे.