खासदार किरीट सोमय्यांच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांचा तीव्र विरोध
दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाला वेगळे वळण मिळू नये यासाठी पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला आहे.
मुंबई: घाटकोपरच्या साईनाथ नगर मध्ये पालिकेचे मातोश्री रमाबाई ठाकरे पालिका रुग्णालयच्या नुतनीकरणाचं भूमिपूजन आज किरीट सोमय्या करणार आहेत. स्थानिक शिवसैनिकांचा या कार्यक्रमाला तीव्र विरोध आहे. घाटकोपर तसेच आजूबाजूच्या विभागातील शिवसैनिकांनी या विभागात जमा होऊ लागले आहे. भाजपचे कार्यकर्ते देखील जमू लागले आहेत. यामुळे या विभागात तणावाची स्थिती झाली आहे. मोठ्या प्रमाणत पोलिसांनी इथे बंदोबस्त तैनात केला आहे.
सोमय्या आणि शिवसैनिक यांच्यात जोरदार संघर्ष
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून खास करून महापालिका निवडणुकांपासून खासदार किरीट सोमय्या आणि शिवसैनिक यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. किरीट सोमय्या यांनी अनेकदा शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेनेही या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, सोमय्या यांनी गेल्या काळात थेट 'मातोश्री'वरच शाब्दिक हल्ला चढवला होता. 'मातोश्री' हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्थान आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेही 'मातोश्री'तूनच शिवसैनिकांना आदेश देत असत. त्यामुळे सोमय्यांनी 'मातोश्री'वर केलेली टीका शिवसैनिकांना चांगलीच लागली आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा सोमय्या यांच्यावर राग असल्याची चर्चा आहे.
मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त
दरम्यान, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाला वेगळे वळण मिळू नये यासाठी पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला आहे.