`वर्षा`वरच्या बैठका घरातल्या समजल्या जातात का? शिवसेनेचं भाजपला प्रत्युत्तर
भाजपने केलेल्या टीकेला शिवसेनेनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : उद्धव ठाकरे हे घराबाहेर न पडलेले राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. दरेकर यांच्या या टीकेला शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
'कोणी सांगितलं मुख्यमंत्री घरात आहेत? मुख्यमंत्री आता वर्षा बंगल्यावर बसून बैठका घेत आहेत. हे कुणाला दिसत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बैठका होत आहेत. शासकीय निवासस्थानावरुन घेतल्या जाणाऱ्या बैठकांना घरातल्या बैठका समजल्या जातात का? याला घरात बसून बैठका म्हणत असतील, तर मग आत्तापर्यंत त्यांनी तरी कुठे बैठका घेतल्या. वर्षा बंगल्यावर बसूनच बैठका घेतल्या ना,' असं अनिल परब म्हणाले आहेत.
विदर्भामध्ये पूरस्थिती आहे, तिकडे आमचे मंत्रीही फिरत आहेत. एकनाथ शिंदे तिकडे आहेत, इतर मंत्रीही आहेत. फक्त देवेंद्र फडणवीस तिकडे फिरत आहेत, असं नाही, अशी प्रतिक्रियाही परब यांनी दिली.
कोरोना संकट, कोकणात निसर्ग चक्रीवादळाचं थैमान, सांगलीचा महापूर, सातारा आणि कोल्हापूमधला पाऊस, विदर्भात पूरस्थिती असतानाही मुख्यमंत्री तिकडे गेले नाहीत. मुख्यमंत्री मंत्रालयात यायलाही तयार नाहीत, कोरोनासंदर्भातल्या बैठकीत नेते मंत्रालयात आले, पण मुख्यमंत्री मुंबईत असूनही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलले, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली.