मुंबई: कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला पुरेशी आर्थिक मदत करत नसल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. कोरोनाविरुद्ध युद्ध लढण्यासाठी पैशांची गरज आहे. मुंबईसारखे शहर केंद्र सरकारला अडीच लाख कोटी रुपये देते. त्यामुळे आता संकटाच्या काळात केंद्राने यापैकी २५ टक्के निधी तरी राज्याला परत द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'.. तर त्यांनी संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं'

कोरोनाचे युद्ध जनताच लढणार आहे व जनताच त्यात मरणार आहे. केंद्र सरकारने खासदारांचे वेतन, भत्ते यामध्ये कपात केली हे ठीक आहे. पण यानिमित्ताने परदेशातील थोडातरी काळा पैसा परत आला असता तर फार बरे झाले असते. कोरोनाविरुद्धच्या लढाईत जनता हेच सैन्य आहे. सैन्य हे पोटावर चालते. त्यामुळे लढाई सुरु असताना केंद्राच्या मदतीअभावी हेच सैन्य उपाशी राहिले तर लढाई कशी लढायची, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.


'भाजप आमदारांचा संकुचितपणा; स्वत:चा पगार पक्षाच्याच कोषात जमा' 

या अग्रलेखातून संकटाच्या काळात संकुचित वृत्तीने वागणाऱ्या भाजप नेत्यांवरही निशाणा साधण्यात आला आहे. राज्यातील भाजपच्या आमदारांनी आपला निधी केंद्रात वळवला. त्यांचा मुख्यमंत्री सहायता निधीवर विश्वास नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेदेखील दिल्लीच्या मार्गाने निघाले आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसचे राज्य असते व हे असे अतरंगी वर्तन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यपालांनी केले असते तर भाजपने महाराष्ट्रात तांडव केले असते. कोरोनाशी लढण्यासाठी मोदी सरकारला पैसा हवा आहे. तसा तो महाराष्ट्रातील ठाकरे सरकारलाही हवाच आहे, असेही या अग्रलेखातून सांगण्यात आले आहे.