मुंबई : न्याय मागणाऱ्यांना बंदुकीच्या गोळ्याच मिळत असून, भाजपच्या राज्यातील ही परिस्थिती असल्याची जळजळीत टीका शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना'तून करण्यात आली आहे. बेळगाव मुद्द्यावरुन 'सामना'तून भाजपला लक्ष्य करण्यात आलं आहे. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीला गोळ्या घालण्याची भाषा केली जाते ते पाकडे आहेत का? असा थेट सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय जनता पक्षाशी संबंधित असणाऱ्या कन्नड संघटनेकडून महाराष्ट्र एकीकरण समितीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं. याच मुद्द्यावरुन भाजपवर तोफ डागत कर्नाटक कोणाचंही राज्य असलं तरीही सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणारे अत्याचार थांबत नसल्याची बाब सामनातून उचलून धरण्यात आली. कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांच्या वक्तव्यावर निशाणा साधत 'सामना'तून शब्दांचे वार करण्यात आले आहेक. सत्याधाऱ्यांमध्ये सीमा भागातील मराठी जनतेवरील अत्याचारांसाठी चढाओढ सुरुच असल्याचा आरोपही मुखपत्रातून करण्यात आला. 


जवळपास गेल्या ६० वर्षांपासून मराठी माणूस हा कानडी सरकारकडून मिळणाऱ्या वागणुकीचा बळी पडला आहे. पण, सीमेचा वाद काही मिटला नाही. कारण हा न्याय आणि सत्तेचा लढा आहे असं अग्रलेखात म्हटलं आहे.  



धैर्यशील मानेंचं भीमाशंकर पाटलांना सडेतोड उत्तर 


कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या वाचाळ भीमाशंकर पाटील यांच्या वादग्रस्त विधानाला शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तर, एन डी पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. बेळगाव सीमा प्रश्नाचा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केलं होतं. यावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकाही सदस्याच्या केसाला धक्का लागला तरी गाठ शिवसेनेशी आहे असा सज्जड इशारा शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी भीमाशंकर पाटील यांना दिला आहे.