मुंबई : भाजप-शिवसेना युतीचा निर्णय मुंबईत होणार असल्याचं आता समोर येतं आहे. युतीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा झाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी दिल्लीत चर्चा झाली. त्यानंतर युतीचा निर्णय मुंबईत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युती होणार की नाही होणार यावरुन आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एकीकडे टीका आणि दुसरीकडे युतीची भाषा अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. त्यामुळे भाजपमध्ये देखील नाराजी आहे. स्वबळाची भाषा दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे. पण पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात य़ाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.


दिल्लीत राजकीय घडामोडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातल्या राजकीय घडामोडींना दिल्लीत वेग आला आहे. दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. राज्यातल्या विविध घडामोडींवर विशेषतः शिवसेना युती आणि धनगर आरक्षण यावर मोदी- शाह आणि फडवणीस यांच्यात प्रदीर्घ खलबतं झाल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीचा अहवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सुपूर्द केला. या बैठकांबाबत अतिशय गुप्तता बाळगली गेली होती.


ठाकरे विरुद्ध दानवे शाब्दीक टीका


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात शाब्दिक टीकेचा सामना सुरू झालेला याआधी पाहायला मिळाला होता. अन्नदात्या शेतकऱ्यांना शिवी देणाऱ्या दानवेंना रडवा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी बुधवारी जालन्याच्या सभेत केलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे माझ्यासह नरेंद्र मोदींवरही पातळी सोडून टीका करतात. आमच्याकडेही शब्द आहेत, अशी प्रतिक्रिया दानवेंनी गुरुवारी औरंगाबादमध्ये दिली होती.


अमित शहांची स्वबळाची भाषा


अमित शहा यांच्या शिवसेनेबाबतच्या विधानानंतर युतीची शक्यता मावळल्या जमा होती असं दिसत होतं. पण त्यानंतर ही भाजपकडून युतीसाठी प्रयत्न केले जातील असे संकेत मिळत होते. 'वन प्लस वन टू नही होता, युती होगी तो साथी को जितायेंगे नही हुई तो पटक देंगे', असं अमित शाह भाजप कार्यकर्त्यांना म्हणाले. शिवसेनेसोबत युती नाही झाली तरी ४८ पैकी ४० जागांवर भाजप उमेदवार निवडून येतील, ही तयारी भाजप कार्यकर्ते करतील, असं वक्तव्य शाह यांनी केलं होतं.


शिवसेनेत 2 मतप्रवाह


अमित शहांनी स्वबळाचे संकेत दिल्यावर शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया आली. मात्र तरीही शिवसेनेत प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरणाऱ्यांना युती व्हावी असंच वाटतं. यामागचं कारण म्हणजे युती झाली नाही तर आपण निवडून येणार नाही ही कल्पना शिवसेनेच्या अनेक खासदारांना आहे. युती झाली नाही तर मतांची विभागणी होऊन फटका बसेल अशी उघड भीती काही खासदार बोलूनही दाखवत आहेत. ज्यांना प्रत्यक्ष निवडणूक लढवायची आहे असे बहुतांश जण युती व्हावी या मताचे आहेत, तर ज्यांना प्रत्यक्ष निवडणूक लढवायची नाही ते सर्व जण युती होऊ नये, भाजपाला धडा शिकवलाच पाहिजे अशा मताचे आहेत. युती होऊ नये असं ज्यांना वाटतं त्यांनी शिवसेना-भाजपामधील वातावरण दिवसेंदिवस बिघडत जाईल अशीच विधानं केली आहेत. तर ज्यांना निवडून यायचंय, त्यांचा युती होण्याचा आशावाद कायम आहे.


2014 मध्ये मोदी लाटेचा फायदा


2014 च्या लोकसभा निवडणुकीत काही अपवाद वगळता शिवसेनेचे सर्वच खासदार हे लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन जिंकले. रायगडचे शिवसेना खासदार अनंत गिते हे अवघ्या 2110 मतांनी निवडून आले आहेत. तर यवतमाळच्या खासदार भावना गवळी या 93816 मतांनी निवडून आल्या आहेत. हे दोन अपवाद वगळले तर भाजपाबरोबरची युती, मोदी लाट आणि  काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारविरोधातील रोष याचा फायदा होऊन शिवसेनेचे इतर सर्वच खासदार एका लाखापेक्षा जास्त मतांची आघाडी घेऊन निवडून आले होते.


शिवसेना खासदारांना हवी युती 


2014 च्या तुलनेत आता परिस्थिती मात्र बदलली आहे. आता युती झाली नाही तर स्वबळावर लढायचे आहे त्यामुळे भाजपची मिळणारी मतं मिळणार नाहीत, शिवसेना सत्तेत असल्याने सत्तेविरोधातील वातावरणाचा फटका बसू शकतो, तर यावेळी कोणतीही लाट नसल्याने तशा लाटेचाही फायदा होणार नाही. त्यामुळेच शिवसेनेच्या खासदारांना युती व्हावी असं वाटतं. मात्र पक्षानं यापूर्वी केलेल्या स्वबळाच्या घोषणेवर पक्ष आजही ठाम आहे.