शिवसेना-भाजप युतीवरून कलगीतुरा, उमेदवार हवालदिल
युती होणार की नाही, याची बेचैनी अधिकच वाढली आहे.
मुंबई : शिवसेना आणि भाजप युतीचा निर्णय होत नसल्यानं विद्यमान खासदारांसह निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवार हवालदिल झाले आहेत. युती झाली नाही तर लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणं अवघड असल्याचा सूर लावण्यात येतो आहे. शिवसेना-भाजपमध्ये युतीवरून कलगीतुरा सुरु आहे. टीका करणाऱ्या वक्तव्यांमुळं कार्यकर्त्यांच्या टाळ्या मिळत असल्या तरी दोन्ही पक्षांचे विद्यमान खासदार आणि निवडणूक लढवण्यास इच्छूक मात्र हवालदिल झाले आहेत. त्यात शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर तर भाजपानं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर स्वतंत्रपणे लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यामुळं युती होणार की नाही, याची बेचैनी अधिकच वाढली आहे.
२०१४ मध्ये भाजपनं २६, तर शिवसेनेनं २२ जागा लढवल्या होत्या. यावेळी लोकसभा तसंच विधानसभेला निम्म्या निम्म्या जागा मिळाव्यात, अशा शिवसेनेचा हट्ट आहे. तर भाजपाला हा फॉर्म्युला मान्य नसल्याचं समजतं आहे. शिवाय २०१४ च्या तुलनेत आता राजकीय वातावरण खुपच बदललं आहे. ग्रामीण भागात दुष्काळाचं सावट असल्यानं जनतेच्या मनांत सरकारबद्दल रोष आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेबरोबर युती न होणं परवडणारं नाही. युती झाली नाही तर मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी होऊ शकते असा सूर भाजपच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. भाजपच्या विद्यमान खासदारांनीही युती व्हावी, अशीच इच्छा व्यक्त केली आहे.
तर दुसरीकडं मातोश्रीवर केवळ संघटनात्मक बैठका सुरू असून युतीसंदर्भात कुठलीही चर्चा सुरू नसल्याचं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, भाजपा शिवसेना युती व्हावी, यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी थेट निवृत्ती महाराजांनाच साकडं घातलं. निवृत्ती महाराजांनी युतीबाबत नेत्यांना सुबुद्धी द्यावी अशी कोपरखळी त्यांनी मारली.
एकीकडे काँग्रेस आघाडीचं जागावाटप होऊन उमेदवार निश्चिती अंतिम टप्प्यात असतांना शिवसेना - भाजपाचे सूर मात्र अजूनही जुळलेले दिसत नाहीत. त्यामुळं उमेदवारांची घालमेल आणखीच वाढली आहे.