`शिवसेना दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करु शकते`
एकट्याने सत्तास्थापन करण्याचे धाडस करू नका, अन्यथा फजिती होईल
मुंबई: शिवसेना आवश्यक बहुमताची जुळवाजुळव करून सरकार स्थापन करू शकते, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी राऊत यांनी भाजपला एकट्याने सत्तास्थापन करण्याचे धाडस करू नका, अन्यथा फजिती होईल, असा इशाराही दिला. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आणखीनच आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
संजय राऊत यांनीही कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. याशिवाय, शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात आज राज्यातील काँग्रेस नेते पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आता भाजपवर दबाव वाढवण्यासाठी आपले पत्ते फेकायला सुरुवात केली आहे. संजय राऊत यांनी आजच्या पत्रकारपरिषदेत भाजपला थेट इशारा दिला.
वक्त के सागर मे कई सिकन्दर डूब गए; संजय राऊतांचा भाजपवर पुन्हा वार
लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्यात झालेली चर्चा संपूर्ण देशाने पाहिली होती. विधानसभा निवडणुकीत जनतेनेही शिवसेना आणि भाजप यांना एकत्रितपणे कौल दिला आहे. जनतेचा हा कौल मानण्यास भाजप नकार देत असेल तर उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही पर्याय उरणार नाही. तशी वेळ आल्यास शिवसेना दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करु शकते, असा दावा यावेळी राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट
मात्र, तुर्तास आम्ही सत्तास्थापनेसाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या संपर्कात नाही. शरद पवारांसोबतची भेट ही केवळ सदिच्छेसाठी होती. मात्र, काँग्रेसची एकूणच विचारसरणी पाहता महाराष्ट्रात भाजपकडे सत्ता जावी, असे त्यांना वाटत नसावे. पाच वर्षांमध्ये त्यांना याचा अनुभव आला असेल. मात्र, सध्या ते आमच्या संपर्कात नाहीत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.