Shivsena Live : शिवसेनेच्या (Shivsena) 40 आमदारांनी बंडाचे निशाण फडकावलं आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर आता 15 आमदार ठाकरे यांच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या त्या 15 आमदारांना पत्र लिहून धमक्या किंवा ऑफरच्या दबावाला बळी न पडता, कठीण काळात पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून डॅमेज कंट्रोल सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरु आहे.


2024 निवडणुकांची तयारी
याचंच एक पुढचं पाऊल म्हणून उद्धव ठाकरे यांनी 2024 निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व माजी आमदारांची बैठक बोलावली आहे. माजी आमदार शिंदे गटात जाऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे माजी आमदारांशी संवाद साधणार आहेत. 


2019 च्या विधानसभा निवडणुकीत जे उमेदवार पराभूत झाले होते, अशा सर्व उमेदवारांची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे. 


शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या गटात कसे येतील यासाठी शिंदे गटाने फिल्डिंग लावली आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरेंनीही बैठकीचा सपाटा लावला आहे. 


खासदारांची बैठक  
काल मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती.  या बैठकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची मागणी खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं चर्चेची दारं उघडी राहतील असं मत खासदारांनी व्यक्त केलं. देशात भाजपने मोठी ताकद निर्माण केली आहे, आपण त्याच्या सोबत राहिलं पाहिजे असं मतंही खासदारांनी व्यक्त केलं.