मुंबई : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत धर्मनिरपेक्षतेच्या प्रश्नाला उत्तर देत अनेकांचं लक्ष वेधलं. पहिली मंत्रीमंडळ बैठक झाल्यानंतर सह्याद्रीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्य़ाचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेने धर्मनिरपेक्षता स्वीकारली का, असा प्रश्न विचारला असता प्रश्नार्थक सूरातच मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. 


शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा थाट पाहून राज ठाकरेंच्या मातोश्री भावूक


'धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? संविधानात जे काही आहे तेच धर्मनिरपेक्ष आहे', असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर तिन्ही मित्रपक्षांकडून शपथविधीपूर्वीच घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. 'धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदू हे हिंदूच राहतील आणि मुस्लिम हे मुस्लिमच राहतील. हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना हे अद्यापही उमगलेलं नाही', असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि नवनिर्वाचित मंत्री जयंत पाटील यांनी केलं. त्यावेळी शिवसेना नेते आणि नवनिर्वाचित मंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. 



गेल्या कित्येक दशकांपासून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर ठाम असणाऱ्या शिवसेनेने भाजपशी असणारी युती तोडली तेव्हापासून त्यांच्यावर काही वर्गांनी टीकाही केली आहे. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सर्वज्ञात असणारं धोरण पाहता त्यांच्याशी हातमिळवणी केलेल्या शिवसेनेकडूनही आता धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार करण्यात आला आहे का, असा प्रश्न सत्तास्थापनेनंतर तातडीने पुढे करण्यात आला.