मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज दुपारी साडे वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी या भेटीत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. मात्र मदतीबाबत अजून ठोस पावलं उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीवर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी या भेटीत करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे सरकारी कामकाज जवळपास बंदच आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी या मागणीसाठी ही भेट असणार आहे. अवकाळी पावसाचा फटका राज्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांना अजूनही कोणतीही मदत मिळू शकलेली नाही. नुकसानीचे पंचनामे ही अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मदत मिळणार की नाही याची चिंता शेतकऱ्याला आहे. हातची आलेली पीकं तर गेलीच पण नवीन पिकांची लागवड करण्यात ही उशीर झाला आहे. 


महाशिवआघाडीने अजूनही सत्तास्थापनेचा दावा केला नसला तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या तिनही पक्षाचे नेते एकत्र राज्यपालांची भेट घेणार आहेत. 


दुसरीकडे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष बंद असल्याने देखील अनेकांचे हाल होत होते. झी २४ तासच्या बातमीनंतर हा कक्ष सुरु करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन ही मदत सुरु करण्याची विनंती केली होती.