शिवसेना नगरसेवक मिलिंद वैद्य यांची कोंबडी विक्रेत्यांना मारहाण
नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी हा रूद्रावतार धारण केला.
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी हा रूद्रावतार धारण केला आहे. माहिम स्थानकालगत काही कोंबडी विक्रेते उघड्यावर गाड्या लावून कोंबड्या विकतात. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते अशी तक्रार मच्छिमार कॉलनी आणि पोलीस कॉलनीतल्या रहिवाशांनी केली होती. हा मुद्दा वारंवार महापालिकेच्या प्रभाग समितीत उपस्थित करूनही महापालिकेने लक्ष दिल्याने अखेर वैद्य यांनी कायदा हाती घेतला.
कणकवलीत आमदार नितेश राणे यांनी रस्त्यांच्या खड्ड्यांना जबाबदार धरत उपअभियंत्याला मारहाण केली. त्यानंतर आता मुंबईत मिलिंद वैद्य यांनी कायदा हाती घेतला आहे. आठवड्याभरापूर्वी वडाळ्याच्या भाजपा नगरसेवक कृष्णावेन्नी रेड्डी यांनी सफाईकामगाराच्या श्रीमुखात मारली होती. रेड्डी यांच्यावर अँटॉप हील पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. मुळात महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तरीही माजी महापौर असलेल्या मिलिंद वैद्य यांच्या तक्रारीलाही महापालिका दाद देत नाही.
मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यात अशा गाड्या लावून कोंबडी विक्री सुरू असते. त्यांना रोख लावणं हे मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखाचं काम आहे. आता वाहतूक शाखा आणि महापालिका अशा गाड्यांवर काय कारवाई करणार याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे.