मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांची उमेदवारी घोषित केली. उद्धव यांनी ही घोषणा करुन रिपाई प्रमुख व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची कोंडी केल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने रिपाईसाठी किमान एक जागा तरी सोडावी, यासाठी रामदास आठवले आग्रही आहेत. यासाठी त्यांनी दक्षिण-मध्य मुंबई किंवा ईशान्य मुंबई या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. सध्या दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे तर ईशान्य मुंबईत भाजपचे किरीट सोमय्या खासदार आहेत. त्यामुळे शिवसेना किंवा भाजपकडून आठवलेंच्या मागणीविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती. मात्र, आज उद्धव ठाकरे यांनी दक्षिण-मध्य मुंबईतून थेट राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आठवले यांच्यासाठी हा पर्याय बंद झाला आहे. परिणामी आता आठवले काय पाऊल उचलणार, याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरपीआयला एकही जागा न देणे हा दलितांचा अपमान- रामदास आठवले


गेल्याच महिन्यात उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना-भाजप युतीची घोषणा केली होती. यावेळी लोकसभेसाठी भाजप २५ तर शिवसेना २३ असे सूत्र निश्चित करण्यात आले होते. मात्र, या सगळ्यात आठवले यांच्या रिपाईचा कोणताही विचार करण्यात आला नव्हता. त्यामुळे रामदास आठवले नाराज झाले होते. आमची उपेक्षा करण्यात आली आहे. हा दलित समाजाचा अपमान आहे, असे आठवले यांनी सांगितले होते.