आरपीआयला एकही जागा न देणे हा दलितांचा अपमान- रामदास आठवले

 भाजपा आणि शिवसेनेने आरपीआय (अ) ला राज्यात एकही जागा दिली नाही तर माझ्या पक्षाला पुढे नेण्याच्या रणनितीवर विचार करावा लागेल असे आठवले म्हणाले. 

Updated: Feb 23, 2019, 12:47 PM IST
आरपीआयला एकही जागा न देणे हा दलितांचा अपमान- रामदास आठवले  title=

नवी दिल्ली :  राज्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेची युती जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात आलेल्या जागावाटपात आरपीआयला स्थान न दिल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले नाराज आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) ला एकही जागा न दिल्याने त्यांनी आपली नारजी व्यक्त केली आहे. आमची उपेक्षा केली गेली आणि दोन्ही पक्षांनी याबद्दल नक्की विचार करावा असे आठवले म्हणत आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने संपर्क केला आहे पण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत राहू इच्छितो असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Image result for sena bjp yuti zee news

जर भाजपा आणि शिवसेनेने आरपीआय (अ) ला राज्यात एकही जागा दिली नाही तर माझ्या पक्षाला पुढे नेण्याच्या रणनितीवर विचार करावा लागेल असे आठवले म्हणाले. महाराष्ट्रात युतीच्या झालेल्या ठरावानुसार आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपा 25 तर शिवसेना 23 जागांवर निवडणूक लढवणार आहे. राज्यात एकूण 48 जागा आहेत. दोन्ही पक्षांनी आपापसात जागावाटप केल्याने आठवलेंच्या पक्षाची गोची झाली आहे. युती होणार की नाही हे आधीच भिजतं घोंगड असताना त्यात जागावाटपात आठवलेंना विचारातही घेतले गेले नाही. त्यामुळे आठवलेंचा राग अनावर झालायं पण सांगणार कोणाला अशी परिस्थिती आहे. रिपब्लिकन पार्टीसाठी एकही जागा न सोडणे ही एक गंभीर बाब आहे. मी अजिबात समाधानी नाही आहे. त्यांनी दलित समाज, आरपीआय आणि माझा देखील अपमान केला आहे. दलित समाजातून याबद्दल तीव्र प्रतिक्रिया येत आहेत, असेही आठवले म्हणाले. 

Image result for athavale zee news

2014 मध्ये आमच्या पक्षासाठी साताऱ्यातील एक जागा सोडली होती. भाजपा आणि शिवसेनेला एकत्र यायला हवे हे मी सारखे म्हणत आलोय पण आरपीआयला विसरणे हे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. आमची महाराष्ट्रात ताकद आहे. आरपीआयच्या मतांमुळेच विजय मिळाला आहे. जर आम्ही सोबत राहीलो नसतो तर मोठं नुकसान झेलावे लागले असते, असे आठवले यांनी सांगितले. यासंदर्भात रामदास आठवले हे भाजपा अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहेत. दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा मी स्वत: व्यक्त केली आहे. दोन्ही पक्षांना माझ्यासाठी जागा सोडावी लागेल असेही आठवले यावेळी म्हणाले.