मुंबई: आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राच्या (IFSC) वादात महाराष्ट्राची बाजू घ्यायची सोडून देवेंद्र फडणवीस गुजरातचीच वकिली करत असल्याची जळजळीत टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकारने १ मे रोजी मुंबईतील प्रस्तावित IFSC केंद्र गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यूपीए सरकारने २००७ ते २०१४ या काळात मुंबईतील IFSC केंद्रासाठी काहीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे हे केंद्र गुजरातमध्ये हलवण्यात आले, असे सांगत फडणवीस यांनी मोदी सरकारची बाजू उचलून धरली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

...तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं- सुभाष देसाई


या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आग ओकण्यात आली आहे. मुंबईतील वित्तीय केंद्र गांधीनगरला कसे गेले, यावरुन सुरु असणारे आरोप-प्रत्यारोप निरर्थक आहेत. अवघ्या १०० दिवसांपूर्वी सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारवर याचे खापर फोडणे योग्य ठरणार नाही. विरोधी पक्षात असताना शिवसेनेने यावर आवाज उठवला होता. आता हे काम फडणवीस व त्यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाने केले पाहिजे. मात्र, फडणवीस हे महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांची बाजू घेऊन बोलत असतील तर हा विरोधी पक्ष कुचकामी आहे.


IFSC: त्यावेळी फडणवीस सरकार मोदींना घाबरून गप्प बसले; काँग्रेसचा पलटवार


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाबाबत फडणवीस यांनी जितक्या जोरबैठका काढल्या तितक्या महाराष्ट्रावरील या अन्यायाविरुद्ध काढल्या असत्या तर बरे झाले असते. खायचे महाराष्ट्राचे आणि गोडवे गायचे महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांचे हे शिवरायांच्या धर्मास धरुन नाही. उद्या भाजपचे उपटसुंभ नेते देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचे योगदान काय?, असा प्रश्नही विचारतील. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या या लोकांना जनता अरबी समुद्रात बुडवेल, अशी टीका शिवसेनेने केली आहे.