मुंबई: राधाकृष्ण विखे-पाटील हे सत्तेअभावी तडफडणाऱ्या माशांचे प्रतिनिधी आहेत, अशी बोचरी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच विखे-पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच सत्तेत राहण्यासाठी काँग्रेस पक्ष लाचार झाल्याची टीकाही त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर 'सामना'तील अग्रलेखातून विखे-पाटील यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्ता नसेल तर पाण्याशिवाय तडफडणाऱ्या माशांप्रमाणे काही मंडळींची तडफड होते. विखे-पाटील याच तडफडणाऱ्या माशांचे प्रतिनिधी आहेत. विखे यांच्यासारखे बाटगे पक्षात घेतल्यामुळे भाजपने स्वत:ची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते आहेत. पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. 


मुख्यमंत्र्यांना भेटून काँग्रेसची नाराजी दूर, महाविकासआघाडी भक्कम असल्याची ग्वाही

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार स्थिर आहे. एकमेकांचा मानसन्मान राखत राज्यशकट हाकले जात आहेत. फार पूर्वी 'थोरातांची कमळा' हा चित्रपट गाजला होता. मात्र, अलीकडे आलेला 'विखे-पाटलांची कमळा'  हा चित्रपट आला आणि पडला, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे. 

विखे-पाटलांचे कोलांटीउडीचे डोंबारी राजकारण फसले. झक मारली आणि भाजपमध्ये गेलो या चिडीतूनच ते टाळूवरचे केस उपटत असतील. विखे घराण्याचा आजचा तालेवारपणा ही काँग्रेसची देणगी आहे. अनेक वर्षे नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या खाटेवर त्यांचे घराणे पाय लांब करुन बसले होते. मध्यंतरही ते शिवसेनेत आले, पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. यानंतर २०१९ च्या निवडणुकीपूर्वी ते फडणवीसवासी झाले. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असतानाच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशी हिंमत (लाचारी) अंगात भिनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, अशी टीकाही शिवसेनेकडून करण्यात आली आहे.