मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळेच सांगलीच्या इस्लामपूरमध्ये कोरोनाचा प्रकोप झाला, अशी मुक्ताफळे उधळणाऱ्या भाजप नेत्यांचा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून समाचार घेण्यात आला आहे. हज यात्रेला गेलेल्या लोकांमुळे इस्लामपूरमध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने झाले. मात्र, भाजपवाल्यांनी मोदींवर टीका केल्यास महामारी पसरते, अशी अंधश्रद्धा पसरवयाला सुरुवात केली आहे. मात्र, तसे असेल तर मग दिल्लीत एका दिवसात २९ नव्या रुग्णांची भर पडली त्याचे काय? फडणवीस-गडकरींच्या नागपुरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २० वर गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भाजप आमदारांचा संकुचितपणा; स्वत:चा पगार पक्षाच्याच कोषात जमा'

या शहरांत मोदींवर कोणीही टीका केल्याचे दिसत नाही. उलट उत्तर प्रदेश, भोपाळ, गुरगावात भाजपचे राज्य आहे आणि तेथेच कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मोदींवर टीका न करणाऱ्या राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह वाढत असतील तर तो मोदींच्या देवत्वाचा पराभव आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे. 

तसेच समाजात अंधश्रद्धा पसरवणारी विधाने करून भाजप नेतेच मोदींची बदनामी करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तर मोदींचे पक्के चाहते आहेत. त्यांनी मोदींचे लांगुनचालन केले तरीही अमेरिकेत कोरोनाने हाहाकार उडवला. न्यूयॉर्कसारखे शहर मृतवत झाले. त्यामुळे मोदीभक्तांनी इस्लामपूर आणि न्यूयॉर्क शहरांना कोणी शिक्षा दिली, याचा खुलासा करावा, अशी खोचक टिप्पणीही 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. 
कोरोनाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी उभा आहे. मात्र, स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचे मेंदू सडले आहेत. इस्लामपूरबाबतचे भाजप नेत्यांचे चवचाल वक्तव्य मोदींच्या कानावर गेले तर तेच अशा भंपक मंडळींबाबत कठोर निर्णय घेतील, असेही शिवसेनेने म्हटले आहे. 

भाजप प्रवक्ते अवधुत वाघ यांच्या वक्तव्यामुळे या सगळ्या वादाला सुरुवात झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मोदींनी लॉकडाऊन करण्यास उशीर केला, अशी टीका केली होती. परंतु, मोदींवर अशाप्रकारे टीका केल्यामुळेच जयंत पाटील यांच्या मतदारसंघात (इस्लामपूर) कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यांना शिक्षा मिळाली, असे अकलेचे तारे अवधुत वाघ यांनी तोडले होते.