कर्नाटकने बेळगाववर हल्ला करुनही फडणवीस सरकार शांत का?- शिवसेना
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
मुंबई: कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बेळगावला राज्याची दुसरी राजधानी करण्याचा मानस व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून याविषयीची सविस्तर भूमिका मांडण्यात आली आहे.
कर्नाटक सरकारचे हे डावपेच सीमाबांधवांच्या जेवढे जिव्हारी लागले आहेत तेवढेच ते महाराष्ट्राच्या आणि मराठी मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी लागणार आहेत काय?, असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
आधी मराठी जनतेवर कानडीची सक्ती झाली, मग बेळगावचे मराठी नाव बदलून 'बेळगावी'असे नामांतर केले, बेळगावात 'विधान भवन'ही उभारले आणि आता मराठमोळय़ा बेळगाववर पुन्हा हल्ला चढवून थेट दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचे कारस्थान रचले जात आहे.
या हालचालींविरुद्ध सीमा भागातील मराठी बांधवांमध्ये आणि महाराष्ट्रातही प्रचंड रोष आहे. महाराष्ट्र सरकार याकडे कसे बघते आणि काय करते आहे याकडे आमचे लक्ष असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
कर्नाटकचा विकास जरुर व्हावा, बेळगावचाही विकास व्हावा. त्याला आक्षेप असण्याचे कारण नाही. कानडी बांधवांशीही आमचा वाद नाही. मात्र, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
या परिस्थितीत मराठीबहुल असलेल्या बेळगाववर असा पुनः पुन्हा हल्ला चढवणे हा आमच्यासाठी चिंतेचा विषय असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.