मुंबई: राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनसीआर) मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु असलेल्या वादात आता शिवसेनेनेही उडी घेतली आहे. आसाममधून विदेशी नागरिकांना बाहेर काढत असताना दीड लाख कश्मिरी हिंदू पंडितांची काश्मीरमध्ये घरवापसी करण्याची हिंमत सरकार दाखवेल काय?, असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून उपस्थित करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसाममधील ४० लाख घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी भाजप सरकारने कंबर कसली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भाषेत सांगायचे तर काँग्रेस सरकारांना जे जमले नाही ते हिमतीचे काम आम्ही करीत आहोत. परकीय नागरिकांना वेचून बाहेर काढण्याचे काम देशभक्तीचेच आहे व अशी हिंमत दाखवल्याबद्दल आम्ही केंद्रीय सरकारचे अभिनंदन करतो, असे सेनेने म्हटले आहे. 



मात्र, केंद्र सरकार आसामचा न्याय काश्मीरमध्येही लावणार का, असा सवालही शिवसेनेने विचारला आहे. आसामातील ४० लाख परकीय नागरिकांनी त्या राज्याचा भूगोल, इतिहास व संस्कृती मारून टाकली आहे.


हा प्रश्न फक्त प्रखर हिंदुत्वाचा नाही, तर आसामातील घुसखोरांइतकाच राष्ट्रीय सुरक्षा व हिंदू संस्कृतीशी जोडलेला आहे. ४० लाख परकीय नागरिकांना क्षणात बाहेर काढणारे केंद्र सरकार हिंदू रक्ताच्या दीड लाख स्वदेशी नागरिकांना कश्मीरात पाठवू शकत नसेल तर या हिमतीची डी.एन.ए. चाचणी करावी लागेल, असा खोचक टोला शिवसेनेने लगावला आहे.