शिवसेनेला `पटकण्या`ची डरकाळी फोडणारे नष्ट झाले, शिवसेनेचे प्रत्युत्तर
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने बुधवारी भाजपवर निशाणा साधला.
मुंबई - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने बुधवारी भाजपवर निशाणा साधला. काही दिवसांपू्र्वी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी जे सोबत येणार नाहीत, त्यांना 'पटक देंगे' असे म्हटले होते. हाच धागा पकडून बुधवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रलेखात शिवसेनेला राजकीय मैदानात ‘पटकण्या’ची पोकळ डरकाळी फोडणारे काळाच्या ओघात नष्ट झाले, असे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासावर बेतलेल्या या अग्रलेखात त्यांची गुणवैशिष्ट्ये ठळकपणे मांडण्यात आली आहेत.
शिवसेनाप्रमुखांचे विस्मरण देशाला कधीच होणार नाही. शतके बदलतील, पिढ्या बदलतील पण बाळासाहेबांचा जन्मदिवस साजरा होत राहिल, यालाच अमरत्व म्हणतात. हे अमरत्व बाळासाहेब सोबत घेऊन आले होते. बाळासाहेबांचा जन्म हा एका तेजाचा जन्म होता. तेच तेज घेऊन शिवसेना आजही उभी आहे, असे सांगून अग्रलेखात म्हटले आहे की, शिवसेना लेच्यापेच्यांची संघटना नाही. भूमिपूत्रांचा लढा असो की हिंदूत्व रक्षणाचा. मर्दांच्या सेनापतीप्रमाणे बाळासाहेब वावरले. भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना झाली. घटनेच्या चौकटीत राहूनच हा लढा सुरू झाला होता. मुंबईत नोकरी-धंद्यात मराठी माणसाला सतत डावलण्यात आले. त्या वेदनेच्या ठिणगीतून शिवसेना जन्मास आली ती बाळासाहेबांचे तेज अंगी बाणवून. भूमिपुत्रांना त्यांच्या राज्यात हक्क मागणे हा गुन्हा ठरवण्यात आला, पण तोच गुन्हा पुढे राष्ट्रीय विचार बनून देशाच्या राजकीय आकाशात विजेप्रमाणे चमकत राहिला. प्रांतीय पक्ष म्हणून शिवसेना महाराष्ट्रातच नाही, तर देशाच्या राजकीय क्षितिजावर तळपत राहिली, असे या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.
बाळासाहेबांनी जे पेरले ते नुसते उगवले नाही, तर टिकून राहिले. शिवसेनेचा विचार हीच शेवटी देशाच्या राजकारणाची दिशा ठरली. कोणत्याही सर्जिकल स्ट्राइकशिवाय अमरनाथ यात्रेवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना दे माय धरणी ठाय करून सोडणारे एकमेव शिवसेनाप्रमुखच होते. त्यांच्या शब्दांत धार होती. विचारांत आग होती. चालण्यात सिंहाचा डौल होता. त्यांनी लोकांना आत्मविश्वास दिला व मनगटात निखारे पेरले. त्यांनी सत्तेचा सारीपाट मांडला नाही. बुद्धिबळाची प्यादी हलवली नाहीत, असेही या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.