मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknat Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकारही कोसळलं. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांविरोधात आक्रमक होत शिवसैनिकांना पक्षासोबत राहण्याचे आवाहन केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आक्रमक होत बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना इशारा दिला होता. मात्र आता शिंदे गटातील आमदारांकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे.


मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी दहिसर कोकणी पाडा बुद्धविहार येथे एका कार्यक्रमात शिवसेनेला इशारा दिला आहे. या कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रकाश सुर्वे यांनी आक्रमक होत चितावणीखोर व प्रक्षोभक भाषण केले.


काय म्हणाले प्रकाश सुर्वे?


"आपण गाफिल राहायचं नाही. यांना यांची जागा दाखवून द्यायची. कुणी आरे केले तर त्याला कारे करा आणि ठोकून काढा प्रकाश सुर्वे इथे बसला आहे. हात नाही तोडता आला तर पाय तोडा. दुसऱ्या दिवशी टेबल जामीन करुन देतो," असे प्रकाश सुर्वे यांनी म्हटले आहे.


"आम्ही कुणाच्या अंगावर जाणार नाही. पण आमच्या अंगावर कुणी आले तर त्याला शिंगावर घेऊन कोथळा फाडल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा प्रकाश सुर्वे यांनी दिला.


दरम्यान, प्रकाश सुर्वे यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये भडकाऊ भाषण केल्यामुळे ठाकरे गटातील शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात गु्न्हा दाखल करुन त्यांच्याविरोधाक कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.