`उद्धव ठाकरेंचं जवळपास ठरलंय; शिवसेनेला १७५ आमदारांचा पाठिंबा`
शिवसेनेकडे सध्याच्या घडीला १७० पेक्षा जास्त आमदारांचे संख्याबळ आहे
मुंबई: भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी महालक्ष्मी रेसकोर्स आणि वानखेडे मैदान बुक केल्याची चर्चा आहे. याची कागदपत्रेही आमच्याकडे आहेत. मात्र, शिवसेनेचा मुख्यमंत्री हा शिवतीर्थावरच शपथ घेईल, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. ते रविवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सुतोवाचही केले. उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक पर्याय खुले होते, त्यांनी नुकतीच एका पर्यायावरची चर्चा संपवली आहे. त्यांचा निर्णयही जवळपास अंतिम झाला आहे. शिवसेनेकडे सध्याच्या घडीला १७० पेक्षा जास्त आमदारांचे संख्याबळ आहे, असा दावा यावेळी राऊत यांनी केला.
या पत्रकारपरिषदेत राऊत यांनी भाजपला युतीच्या जुन्या दिवसांची आठवणही करून दिली. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यात चांगला संवाद होता. तेव्हा बाळासाहेब भाजपला अनेक गोष्टी उदारपणे द्यायचे, असे राऊत यांनी सांगितले.
...तर मंत्रिमंडळात 'ईडी'चा एक प्रतिनिधी सामील करावा लागेल- संजय राऊत
महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी ईडीचा घाणेरड्या पद्धतीने वापर झाल्याचाही आरोपही राऊत यांनी केला. कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेसाठी ऑपरेशन कमळ राबविण्यात आले होते. हे करताना काय काय गोष्टी झाल्या, याचे पुरावे नुकतेच समोर आले आहेत. महाराष्ट्रातही अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ईडी आणि सीबीआयचा वापर करून झालेले सरकार स्थापनेचे प्रयत्न हे फोल ठरले आहेत, हे संबंधितांनी लक्षात ठेवावे. महाराष्ट्रात अत्यंत घाणेरड्या पद्धतीचे राजकारण झाले, गुंडही या थराला जाणार नाहीत. त्यासाठी कोण कुठे जात होते, काय बोलत होते, याचा खुलासा आम्ही लवकरच करू, असे राऊत यांनी म्हटले.
फडणवीस आणि उद्धव ठाकरे दौऱ्यावर; तहाची चर्चा लांबणीवर?
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे सातत्याने पत्रकारपरिषद घेऊन आक्रमकपणे शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. कोणत्याही परिस्थितीत शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरून माघार घेणार नाही, हे त्यांनी वारंवार ठणकावून सांगितले आहे. मात्र, भाजपकडून अजूनपर्यंत त्याला थेटपणे प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. सुरुवातीला ३ तारखेला भाजपच्या मंत्रिमंडळाची शपथविधी महालक्ष्मी रेसकोर्सवर होणार असल्याची चर्चा होती. यानंतर भाजपने पाच तारखेच्या शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम बुक केल्याचीही चर्चा होती. मात्र, संजय राऊत यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतीर्थावरच शपथ घेईल, असे सांगत वेगळ्या समीकरणांचे संकेत दिले आहेत.