मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भाजपला धक्का देत पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे २०१९मध्ये शिवसेना भाजप युती होणार का? हा प्रश्न सध्यातरी बऱ्यापैकी निकाली निघाला आहे. पक्षाचे मुखपत्र दै. सामनातून उद्धव ठाकरे यांची दीर्घ मुलाखत तीन भागांत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीदरम्यान ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. आजच्या तिसऱ्या आणि अंतिम भागात ठाकरे यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना सर्वच्या सर्व म्हणजे २८८ जागा स्वबळावर लढणार असल्याचे संगेत दिले. दरम्यान, आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आव्हान दिले आहे. 'एकदाच काय काय तो सोक्षमोक्ष लावत पाकिस्तानचा निकाल लावावा. आमचे सैनिक नाहक जाताहेत. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे एक घाव दोन तुकडे करा', असे ठाकरे यांनी मोदींना आव्हान देताना म्हटले आहे.


शिवसेना २८८ जागा लढवणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुलाखतीच्या आजच्या भागात शिवसेना प्रत्येक मतदारसंघात (२८८ जागा) लढणार आहे का?, असा सवाल विचारण्यात आला. त्यावर 'नक्कीच लढणार. आणि मी मध्ये पण म्हटलं की, स्वबळाची घोषणा किंवा युतीची घोषणा ही एकटय़ाची नसते. याचा अर्थ माझ्या राष्ट्रीय कार्यकारिणीने तो घेतलेला निर्णय आहे, शिवसेनेच्या. सगळ्यांनी मिळून घेतलेला तो निर्णय आहे', असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.


धमक्यांना मी भीक घालत नाही


‘वन नेशन वन इलेक्शन’ हा एक नारा दिला जातोय. पण हिंदुस्थानच्या लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या सर्व निवडणुका एकत्र घेणं योग्य आहे?  या प्रश्नावर 'नाही… मी संधी मानतोय. माझी तीच अपेक्षा आहे की दोन्ही निवडणुका एकत्रच व्हाव्यात. धमक्या कसल्या? मी धमक्यांना भीक घालत नाही. ‘वन नेशन वन इलेक्शन’ म्हणजे सगळ्या निवडणुका एकदम. आपल्याकडे म्हटलं जातं ना तुम्ही सगळ्यांना एकदा मूर्ख बनवू शकता, एकाला सर्वकाळ मूर्ख बनवू शकता, पण सर्वांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही. तर मग ज्यांच्या सुपीक डोक्यात ही कल्पना आहे त्या सर्वांना एकदा मूर्ख बनविण्याची संधी म्हणून ते ‘वन नेशन’वाले इलेक्शन बघताहेत का? की एकदाच प्रत्येक वेळाला कारण किती वेळा जाऊन फसवत बसवायचे. सगळ्यांना एकदा बनवू शकाल. सगळ्यांना परत परत मूर्ख नाही बनवता येत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.