दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याच्या मुद्द्यावरून राज्यपाल आणि संजय राऊत आमनेसामने आले होते. यामुळे त्यांच्यात कटुता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. या भेटीनंतर राऊत यांनी दिलेल्या एकूण प्रतिक्रियेचा सूर पाहता दोघांमधील कटुता दूर झाल्याचे दिसत आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी महाविकाआघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषेदवर वर्णी लावावी, असा आग्रह धरला होता. जेणेकरून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी राहण्यात कोणतीही अडचण उद्भवली नसती. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने बैठक घेऊन रितसर ठरावही मंजूर केला होता. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तांत्रिक कारण पुढे करत हा प्रस्ताव नाकारला होता. या संपूर्ण काळात भाजपचे नेते सातत्याने राजभवनावर जात होते.


राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये- संजय राऊत


त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या मुद्द्यावरून शिवसेनेसह महाविकासआघाडीत अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यावेळी संजय राऊत यांनी राजभवन हा फालतू राजकारणाचा अड्डा झाल्याची टीका केली होती. संजय राऊत यांच्या या टीकेमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चांगलेच दुखावले गेले होते. 

मात्र, नंतरच्या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत: पुढाकार घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्यात विधानपरिषद निवडणूक घेण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने ही विनंती मान्य केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, यानंतरही संजय राऊत आणि राज्यपालांमध्ये सुप्त तणाव होता.


आता बरेच आत्मे शांत झाले असतील; संजय राऊतांची खोचक टिप्पणी


या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन या कटुतेला तिलांजली दिल्याचे सांगितले जाते. विधानपरिषद निवडणूक व्हावी, यासाठी राज्यपालांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. परिणामी उद्धव यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला होता. याबद्दल आभार मानण्यासाठी राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. या भेटीनंतर संजय राऊत यांनी म्हटले की,  राज्यपाल आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे आणि माझे खूप जुने संबंध आहेत. खूप दिवस त्यांना भेटलो नव्हतो. त्यामुळे आज त्यांची सदिच्छा भेट घेतल्याचे राऊत यांनी सांगितले. 

तसेच राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही कोणताही दुरावा नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचेही मधूर संबंध आहेत. दोघांमध्ये पिता-पुत्राचं नातं आहे. सरकार आणि राज्यपालांमध्ये कोणतीही दरी नाही. आमच्यात दऱ्या वैगैरे वाढत नाही. ते पालक असून घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपाल हे सर्वांना प्रियच असतात. पण विरोधक जेव्हा राजकारण करतात तेव्हा आम्ही भाष्य करत असतो, असे राऊत यांनी सांगितले.