`भाजपने RSS ला संपवण्याचं ठरवलंय`, संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut Shivsena : भारताच्या राजकारणात सध्या भाजपची मातृक संस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातील संदर्भांमुळं सर्वांच्याच नजरा वळत आहेत.
Sanjay Raut Shivsena : अजित पवार यांच्यासोबतच्या युतीपासून मणिपूरमधील (Manipur Voilence) अशांततेपर्यंतच्या मुद्द्यांवर मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात भाजपच्य़ा मातृक संस्थेकडून सातत्यानं भूमिका मांडली जात आहे. एकिकडून सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य आणि त्यामागोमागच संघाच्या मुखपत्रात केलेला उल्लेख पाहता आता विरोधी पक्ष आणि नेतेमंडळींनीही आपल्या भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करत संघानंच भाजपला नैतिक ताकद दिल्याचा मुद्दा अधोरेखित केला.
भाजप आणि शिवसेनेची युती तुटली नाही पाहिजे असंही संघानं सांगितलं होतं, कधीकाळी हाच संघ भाजपची मातृक संस्था होती. पण, आता मात्र भाजपनं संघाला संपवण्याचं ठरवलं आहे, असं संजय राऊत परखडपणे म्हणाले.
'ज्या अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा मोदी करत होते त्याचा या सर्वांना भाजपने आपल्या वॉशिंग मशीन मध्ये टाकून देशात आणि महाराष्ट्रात आपण कायम राहू यासाठी प्रयत्न केले. अहंकाराच्या सर्व मर्यादा मोदी आणि शाह यांनी सोडल्या आहेत. सध्या भाजपमध्ये असणारी संघाची मंडळी भाजपविरोधात आवाज उचलणार का?', असं म्हणताना राऊतांनी शिवसेनेच्या मुखपत्राचा उल्लेख करत आम्ही 'सामना'मध्ये लिहितो आणि ॲक्शन सुद्धा घेतो अशा शब्दांत संघाच्या भूमिकेला निशाण्यावर घेतलं.
हेसुद्धा वाचा : भारतात घुसखोरी करण्यासाठी पाक आश्रित दहशतवाद्यांचा 'हा' नवा कट; अमरनाथ यात्रेआधी उधळले विद्रोही मनसुबे
'मणिपूरमधील हिंसाचार आणि अशांत वातावरणावरून वक्तव्य करणारे सरसंघचालक मोहन भागवत कुठे काश्मीर मणिपूर मध्ये गेले? जर तुम्ही जात असाल तर आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत... बोलून काय होणार तुम्ही नेतृत्व करा, आम्ही येऊ तुमच्या सोबत' अशा शब्दांत सरसंघचालकांना खुलं आव्हान दिलं.
राज्यसभेवर भाजपच्याच बळावर सुनेत्रा पवारांची नियुक्ती होणार?
राज्यसभेच्या उमेदवारीनिमित्त सुनेत्रा पवारांचं नाव चर्चेत येतानाच, अजित पवारांकडे सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठीचं संख्याबळ नाही ही वस्तुस्थिती राऊतांनी मांडली. भाजपच्या मदतीनं अजित पवार यांची पत्नी राज्यासभेवर जाणार. अशावेळी संघाची काय भूमिका असेल? ते विरोध करणार का? असा खडा सवाल राऊतांनी उपस्थित केला.