मुंबई: शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात सध्या राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवरून निर्माण झालेल्या सुप्त तणावाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत पुन्हा एकदा निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची 'सामना' वृत्तपत्रासाठी मुलाखत घेतली आहे. याचा फोटो राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आता सर्वांनाच या मुलाखतीची उत्सुकता लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मातोश्रीवरुन परतल्यानंतर अनिल देशमुख आणि पोलीस आयुक्तांची बैठक

विशेष म्हणजे आज संध्याकाळीच शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील या बैठकीला शिवसेना आणि राष्ट्रवादीतील सुप्त तणावाची पार्श्वभूमी होती. मात्र, आता संजय राऊत यांनी आपण आजच शरद पवार यांची मुलाखत घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील तणाव हे केवळ पेल्यातील वादळ आहे का? संजय राऊत यांनी पवारांची मुलाखत मातोश्रीवरील बैठकीआधी घेतली की नंतर घेतली?, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि संजय  राऊतांनी पुन्हा एकदा अचूक टायमिंग साधल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत आहे.



२ जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्याचे आदेश काढले होते. मात्र, रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी हे आदेश रद्द केले होते. यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील समन्वय बिघडल्याची चर्चा सुरु झाली होती. या सगळ्याला अहमदनगरच्या पारनेरमध्ये राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे वादाची आणखीनच फोडणी मिळाली. त्यामुळे महाविकासआघाडीच्या स्थैर्यावर प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात झाली होती. 

मात्र, आज संध्याकाळी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी सगळ्यांनी उद्धव ठाकरे यांची समजूत घालत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर काहीवेळातच राऊत यांनी सोशल मीडियावरून शरद पवार यांची मुलाखत घेतल्याची माहिती दिली. ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारी ठरेल, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.