शिवसेनेच्या इच्छुकांचा मेळावा, बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न
भाजपा-शिवसेना युतीची घोषणा पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजे उद्या होण्याची शक्यता आहे.
मुंबई : भाजपा-शिवसेना युतीची घोषणा पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजे उद्या होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे महत्वाचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांचा मेळावा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत.
युती झाल्यानंतर तसंच उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत बंडखोर तसंच नाराजांची संख्या वाढू नये, याची काळजी शिवसेना घेत आहे. या मेळाव्यातून संदेश देण्याबरोबरच विधानसभा निवडणुकीत सेना उमेदवाराला कुठलाही दगाफटका होवू नये, याच्या सूचनाही दिल्या जातील. तसंच युती झाल्यास मित्रपक्ष भाजपच्या उमेदवारासाठीही प्रामाणिकपणे काम करण्याचे आदेश दिले जातील. या मेळाव्यासाठी सर्व जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि इच्छुक उमेदवारांना बोलवण्यात आलं आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप १४४ आणि शिवसेना १२६ जागा लढवणार असल्याचे बोलले जात आहे. तर मित्रपक्षांच्या वाट्याला १८ जागा सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्याआधी ११९ जागा शिवसेनेला देण्यासाठी भाजप तयार होता. त्यापेक्षा जास्त जागा देण्याला अमित शाह यांचा विरोध होता. तर शिवसेनेकडून जास्त जागांची मागणी होती. त्यामुळे यावर तोडगा काढण्याचे काम सुरू होते. अखेर यावर तोडगा निघाल्याचे सांगितले जात आहे.