मुंबईकरांना दिलासा मिळणार? 700 स्क्वेअर फुटांपर्यत मालमत्ता कर माफ होणार? CM फडणवीसांकडे मागणी
सरकारने 700 स्क्वेअर फुटापर्यत मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.
सरकारने 700 स्क्वेअर फुटापर्यत मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. मुंबईकरांसाठी आतापर्यंत 500 चौरस फुटापर्यंत मालमत्ता कराला माफी होती. पण आता सरकारने 700 स्क्वेवर फुटापर्यत मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी यासंदर्भात निवेदन दिलं आहे.
विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असून अजय चौधरी यांनी यावेळी मुंबईतील मालमत्ता कराचा मुद्दा मांडला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिका क्षेत्रातील 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना, निवासी गाळ्यांना मालमत्ता कर माफ केला होता. मुंबईत मराठी माणूस टिकावा आणि मुंबईतील घरं विकून विस्थापित व्हावं लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. आता अजय चौधऱी यांनी ही मर्यादा 700 स्क्वेअर फुटांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.
मुंबईत सध्या जुन्या चाळी आणि म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासात 550 ते 650 स्क्वेअर फुटांचे घर मिळणार आहे. अभुदय नगर येथेही पुनर्विकास प्रकल्पात 650 पेक्षा जास्त चौरस फुटांचं घर मिळणं प्रस्तावित आहे. येथे राहणाऱ्या मराठी माणसांचा टक्का जास्त आहे. त्यांना मालमत्ता कर भरणं परवडणारं नाही. त्यामुळे सध्याचा विचार करता मुंबई पालिका क्षेत्रातील 700 स्क्वेअर फुटांच्या घऱांचा मालमत्ता कर माफ करणं गरजेचं आहे असं अजय चौधरी म्हणाले आहेत.