मुंबई : सत्तास्थापनेच्या हालचालींना आता चांगलाच वेग आला आहे. त्यातच शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अधिक आग्रही आणि आक्रमक होत असल्याचं गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून पाहायला मिळालं. भाजपकडून सत्तास्थापनेसाठीचे सर्वतोपरी प्रयत्न करणय्यात येत असल्याचं म्हणत आता पैशांच्या वापर करत शिवसेनेचे आमदार फोडण्यावर काही 'बाटगे' भर देत आहेत असं म्हणत अग्रलेखातून फोडीचं राजकारण करणाऱ्यांवर शाब्दिक वार करण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्ताधारी ज्या महायुतीचा उल्लेख करत आहेत त्याचा उल्लेख बिन आमदारांचं महामंडळ म्हणून करण्यात आला आहे. मावळतं सरकार अधिक चिंतेत असल्याचं म्हणत सरकार दरबारी असल्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेल्या सर्व गोष्टी दुरावण्याती चिंताही त्यांना सतावत असल्याचं म्हणत कोणी 'बाटगा' फोडीचं राजकारण करत असेत तर, त्याला ही जनता सोडणार नाही असं थेट शब्दांत अग्रलेखातून सांगण्यात आलं आहे. 


गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते सुधीर मुगंटीवार हे गोड बातमी लवकरच मिळणार असल्याचं म्हणत आहेत, पण आता ही गोड बातमी नेमकी कसली? कोण बाळंत होणार आहे की कोणाचं लग्न ठरलं आहे? असे उपरोधिक प्रश्न करत अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर कोपरखळी मारण्यात आली आहे. 



पाळणा हलणार का आणि हलला तरी तो कसा हलेल ? असे मुद्दे उपस्थित करत, सध्याच्या घडीला सुरु असणारं हे राजकीय नाट्य, झुंडशाही महाराष्टाराला आणि शिवरायांच्या परंपरेला सोभणारी नसल्याची बाब अग्रलेखातून अधोरेखित करण्यात आली आहे. नैतिक मुल्यांना डावलून होणाऱ्या राजकारणाच्या माध्यमातून कोणालाही सत्तेवर येता येणार नाही असं स्पष्ट करत पुन्हा एकदा शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठीचा आक्रमक सूर आळवण्यात आला आहे.