मुंबई : एका नौटंक्यासाठी छाती बडवणं बंद करा, असा घणाघाती प्रहार शिवसेनेचे मुखपत्र सामनातून करण्यात आलायं. लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळला म्हणणारे पहिल्या स्तंभाला उखाडू पाहतायत असेही यात म्हटलंय. रिपब्लीक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना झालेली अटक भाजपच्या जिव्हारी लागली आहे. राज्यात आणीबाणी सुरु असल्याची टीका भाजप नेत्यांनी केलीय. या पार्श्वभुमीवर सामनातून साऱ्याचा समाचार घेण्यात आलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारवर टीका केली म्हणून नव्हे तर आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आलीय. त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याला फसवूक आणि आर्थिक व्यवहाराचा संदर्भ आहे. आधीच्या सरकारने हे प्रकरण दडपले. पोलीस, न्यायालयावर दबाब आणण्याचा प्रयत्न केला. आपल्या पतीच्या मृत्यूची चौकशी करावी असे एका महिलेला वाटत असेल तर गैर काय ? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. 


आणीबाणी, पत्रकारितेवरील हल्ला आणि अर्णब यांच्या पत्रकारितेचा एकमेकांशी संबंध नाही. भाजपवाल्यांनी अन्वय नाईकला न्याय मिळवून देण्यासाठी वाद घालायला हवा. पण त्यांना सवतीचं पोर मांडीवर खेळवण्यात मज्जा वाटतेय. मराठी माणूस मेला तरी चालेल पण सवतीच्या पोराला चमच्याने दूध पाजण्यात भाजपला धन्यता वाटतेय अशी टीका सामनातून करण्यात आलीय. 



कायद्यासमोर सर्वजण सारखेच असतात हा इतिहास आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील कायद्याच्या चौकटीतून तावून सुलाखून बाहेर पडलेयत. सीतेवर आरोप होताच रामानेही अग्नी परीक्षेची वेळ आणली. ते तर रामराज्य होते. सीतेची अग्नी परीक्षा म्हणजे बेगडी रामभक्तांना रामाची हुकूमशाही वाटली का ? असा प्रश्न सामनातून विचारण्यात आलाय.