मुंबई: मोदी सरकारच्या नव्या पर्वाला गुरूवारपासून प्रारंभ होत आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदी खास मान्यवरांच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील. यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) काही खासदारही मंत्रिपदाची शपथ घेतील. गेल्या काही दिवसांपासून मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापैकी सर्व नावे अजूनही समोर आली नसली तरी भाजपचा जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला मात्र एक मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्चित झाले होते. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपदासाठी अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.


कोण होणार मोदी सरकारमध्ये मंत्री? या नेत्यांचं मंत्रीपद निश्चित


अरविंद सावंत हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. शिवसेनेच्या सुरुवातीच्या दिवसांपासून सावंत हे पक्षाचे कार्यकर्ते होते. मात्र, आज ते केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांचा हा प्रवास अनेकांचे लक्ष वेधून घेणार आहे. अरविंद सावंत हे १९९५ पर्यंत महानगर टेलिफोन निगम लिमिटेडमध्ये (एमटीएनएल) अभियंता म्हणून काम करायचे. १९९५ साली विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वर्णी लागल्यानंतर अरविंद सावंत यांनी एमटीएनएलमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. यानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवून ते नगरसेवकही झाले. या काळात अरविंद सावंत यांनी एमटीएनएलमध्ये कामगार नेता म्हणून चांगलाच जम बसवला होता. ते MTNL च्या कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत.


यानंतर २०१४ साली त्यांनी दक्षिण मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी मोदी लाटेच्या बळावर सावंत यांनी तत्कालीन खासदार मिलिंद देवरा यांचा १,२८, ५६४ मतांनी पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीतही लोकांची नाराजी असूनही सावंत पुन्हा एकदा निवडून येण्यात यशस्वी ठरले. यानंतर आता त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळणार आहे.