मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर गुरुवारी दिल्लीत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. यावेळी नव्या मंत्र्यांचा शपथविधीही पार पडेल. त्यामुळे मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून १८ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला एक मंत्रिपद मिळणार आहे. यासाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका खासदाराचे नाव सुचविण्यास सांगण्यात आले होते. यानंतर उद्धव यांनी अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. 


कोण होणार मोदी सरकारमध्ये मंत्री? या नेत्यांचं मंत्रीपद निश्चित


अरविंद सावंत दक्षिण मुंबई मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा एका लाखापेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. अरविंद सावंत हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या वर्तुळातील नेते आहेत. त्यामुळेच सावंत यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेकडून राज्यसभा सदस्य अनिल देसाई, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत आणि यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, अखेर मंत्रिपदासाठी सावंत यांचे नाव निश्चित करण्यात आले.


दरम्यान, महाराष्ट्रातील भाजप खासदारांपैकी मंत्रिपदावर नितीन गडकरी, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर यांची पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर रामदास आठवले यांचेही मंत्रिपद निश्चित मानले जाते. सुभाष भामरे यांना पुन्हा मंत्रिपद मिळेल का, याची उत्सुकता आहे. हंसराज अहिर पराभूत झाले असले, तरी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.


अमित शहा मंत्री होताच जेपी नड्डा होणार भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष?