संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या आमेसामने, कोण कोणाला तुरुंगात पाठवणार?
संजय राऊत (Sanjay Raut) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हा सामना जोरदार सुरू झाला आहे.
मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हा सामना जोरदार सुरू झाला आहे. आज राऊतांनी सोमय्यांवर घोटाळ्याचे नवे गंभीर आरोप केले. एवढंच नाही तर सगळी कागदपत्रं घेऊन राऊत वर्षा या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शासकीय निवासस्थानावर भेटीलाही गेले. (shivsena mp sanjay raut and bjp former mp and leader kirit somaiya controversy over to scam)
अर्जुनाच्या निशाण्यावर जसा पक्ष्याचा डोळा होता, तसे आता राऊतांच्या निशाण्यावर एकमेव किरीट सोमय्या. घड्याळाचे २४ तासही कमी पडावेत, इतके राऊत सोमय्यांच्या पाठी हात धुवून लागलेत.
राऊतांनी पहिला बॉल टाकला मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष अमोल काळेंवर. सोमय्यांनी फडणवीसांच्या नावावर वसुली केली, असा ताजा गंभीर आरोप राऊतांनी सोमय्यांवर केला. किरीट सोमय्यांनीही आक्रमक होत राऊतांना प्रत्युत्तर दिलं.
सोमय्यांची ही पत्रकार परिषद संपते न संपते तोच संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर पोहोचले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील वर्षावर पोहचले. पुढे काय करायचं, यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि संजय राऊत यांची वर्षावर अर्धा ते पाऊण तास खलबतं झाली.
संजय राऊत वर्षावरुन बाहेर पडले, आणि सामना ऑफिसला पोहोचले. पुढच्या काही दिवसांत राऊत विरुद्ध सोमय्या हा संघर्ष आणखी भडकणार आहे.
आरोप, चिखलफेक, धमक्या, शिव्या, इशारे, महाराष्ट्रातलं राजकारण या स्तरावर आलंय. जो तो एकमेकाला बेड्या ठोकण्याची भाषा करतोय. मात्र कोण कुणाला तुरूंगात पाठवणार हे वेळच ठरवणार.